इन्स्टाग्रामवरील ओळखीचे प्रेमसंबंधांत रूपांतर; एटापल्लीत मित्राचाच गळा चिरून खून
लग्नास नकार दिल्याच्या रागातून संतप्त प्रियकराचे टोकाचे पाऊल; आरोपीला नागरिकांनी पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन
राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
एटापल्ली : प्रतिनिधी
सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत, त्यानंतर प्रेमसंबंधांत आणि अखेरीस रक्तरंजित गुन्ह्यात झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात उघडकीस आली आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका युवकाने आपल्या मित्राचा चाकूने गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी सकाळी देवदा गावाजवळ घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत युवकाचे नाव सतीशकुमार जगदीशप्रकाश निसाद (वय ३२, रा. नागेपल्ली, ता. अहेरी) असे असून, सूरज हलदार (वय ३०, रा. मिरगन, ता. रायघर, जि. नबरंगपूर, ओडिशा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीशकुमार यांचा नागेपल्ली येथे गॅरेज व्यवसाय होता. काही महिन्यांपूर्वी त्यांची आणि सूरज हलदार यांची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे मैत्रीत आणि नंतर घनिष्ठ संबंधांत रूपांतर झाले. दरम्यान, सूरज याने सतीशकुमार यांच्याकडे लग्नाची मागणी घातली होती. मात्र, सतीशकुमार विवाहित असल्याने त्यांनी या प्रस्तावाला नकार दिला होता.
दोन दिवसांपूर्वी सूरज हा ओडिशाहून सतीशकुमार यांना भेटण्यासाठी नागेपल्ली येथे आला होता. त्यावेळी सतीशकुमार विवाहित असल्याची माहिती त्याला मिळाली. रविवारी पहाटे सूरज आपल्या गावी परतण्यासाठी निघाला असता, सतीशकुमार त्याला चारचाकी वाहनातून छत्तीसगड सीमाभागाच्या मार्गे सोडण्यासाठी जात होते.
देवदा गावाजवळ पोहोचल्यानंतर दोघांमध्ये सतीशकुमार यांच्या वैवाहिक स्थितीवरून तीव्र वाद झाला. या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. संतापाच्या भरात सूरजने सोबत आणलेल्या चाकूने सतीशकुमार यांच्यावर सपासप वार केले आणि त्यांचा गळा चिरला. गंभीर जखमी झालेल्या सतीशकुमार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी पसार होण्याच्या प्रयत्नात असताना परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास सुरू केला. आरोपी सूरज हलदार याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या खळबळजनक घटनेमुळे एटापल्ली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.
