तहानलेल्या मुक्या जीवांसाठी ‘मूलकला फाऊंडेशन’चा माणुसकीचा झरा; जंगलात सुरू केल्या पाणपोया..!
प्रखर उन्हात वन्य प्राणी आणि पक्ष्यांना दिलासा; नागरिकांकडून उपक्रमाचे कौतुक
सिरोंचा (प्रतिनिधी) :
वाढत्या उन्हाच्या तीव्र झळांमुळे जंगल परिसरातील वन्य प्राणी आणि पक्ष्यांचे जीवन संकटात सापडले असताना, मूलकला फाऊंडेशनने माणुसकीचा आदर्श घालून देणारा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. सिरोंचा – असरअल्ली मार्गावरील आईपेठा आणि वडदाम गावांदरम्यानच्या दाट जंगल परिसरात वन्य जीवांसाठी पाणपोई सुरू करण्यात आली आहे.
या जंगल परिसरात हरिण, माकड तसेच विविध प्रकारचे पक्षी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. मात्र यंदाच्या तीव्र उष्णतेमुळे आणि पाण्याच्या टंचाईमुळे अनेक वन्य जीव तहानेने व्याकूळ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही ठिकाणी पाण्याअभावी वन्य प्राणी व पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
ही गंभीर बाब लक्षात घेऊन मूलकला फाऊंडेशनचे प्रमुख सागर मूलकला यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पुढाकार घेतला. चिन्ना, राजू, आकाश, कल्याण, उदय आणि स्वामीराज यांच्या सहकार्याने जंगल परिसरातील विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवून त्यामध्ये नियमित पाणी भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रस्त्यालगत ठेवण्यात आलेल्या या पाणपोयांमुळे तहानलेल्या मुक्या जीवांना मोठा आधार मिळत असून, या मार्गावरून प्रवास करणारे नागरिकही या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत आहेत.
“जंगलातील प्राणी आणि पक्षी हे निसर्गाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे,” असे मत फाऊंडेशनच्या सदस्यांनी व्यक्त केले.
यासोबतच, या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातून थोडे पाणी आणून या टाक्यांमध्ये टाकावे, असे भावनिक आवाहनही फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
उन्हाच्या कडाक्यात तहानलेल्या वन्यजीवांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात मानवता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश दिला जात आहे.
