छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य; स्वामी आनंद स्वरूप यांचा NSUI कडून जाहीर निषेध
गडचिरोलीत तक्रार दाखल; संबंधितावर कठोर कारवाईची मागणी
गडचिरोली, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व दिशाभूल करणारी पोस्ट केल्याच्या निषेधार्थ गडचिरोली शहरात संतापाची लाट उसळली आहे. “स्वामी आनंद स्वरूप” या नावाने चालविण्यात येणाऱ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून संबंधित पोस्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याची तक्रार करण्यात आली आहे.
सदर पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धकौशल्याबाबत चुकीची, ऐतिहासिकदृष्ट्या दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच काही सार्वजनिक व्यक्तींविषयीही उल्लेख करण्यात आल्याने सामाजिक सौहार्द बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित व्यक्तीवर तात्काळ व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन गडचिरोलीचे एपीआय विजय मोसूंनवार यांच्याकडे निवेदन सुपूर्त करण्यात आले. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, नागरिकांनी अशा प्रकारच्या भडकावू व समाजविघातक पोस्टवर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली असून दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
यावेळी अभिषेक चौधरी, जावेद खान, कुशब म्हशाखेत्री, गितेश तात्पल्लीवार, कुणाल शिवणकर, प्रणय देशमुख, प्रशांत कुसराम, सौरभ कोटकर, अजय चापले, रूनिक दुधबळे, दीर्घायु बोहरे, वेदांत कुकडे आदी NSUI पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
