राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
गट्टा शाळेच्या प्रितम पदा याची एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये निवड
ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या यशाने गावात आनंदाचे वातावरण; सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव
गट्टा (प्रतिनिधी):
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, गट्टा येथील इयत्ता सहावीतील विद्यार्थी प्रितम सोमजी पदा (रा. गट्टा) याची एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल (EMRS) मध्ये निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची बाब मानली जात असल्याने गट्टा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्रितमवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रितमने आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये प्रवेश मिळवणे ही मोठी संधी मानली जाते. त्यामुळे प्रितमच्या या यशामुळे शाळा, गाव तसेच त्याच्या कुटुंबियांचा अभिमान उंचावला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांनी प्रितमचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पुढील शिक्षणातही प्रितमने अशीच प्रगती करत उज्ज्वल भविष्य घडवावे, अशा शुभेच्छाही यावेळी देण्यात आल्या.
