नक्षलविरोधी मोहिमेचे शिल्पकार निलोत्पल यांची कोल्हापूरला बदली; गडचिरोलीचे नवे एसपी एम. रमेश
साडेतीन वर्षांत नक्षल चळवळीला मोठा धक्का; ५० हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा, शेकडोंचे आत्मसमर्पण
गडचिरोली, ता. २० :
गडचिरोली जिल्ह्याच्या सुरक्षाव्यवस्थेत महत्त्वाचा बदल झाला असून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांची नव्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी केले.
निलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्यात साडेतीन वर्षे कार्य करत जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळात नक्षलविरोधी मोहिमेला मोठी गती मिळाली. दुर्गम आणि संवेदनशील भागात पोलिसांनी आक्रमक कारवाया राबवत ५० हून अधिक जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवले. तसेच शासनाच्या आत्मसमर्पण धोरणाला प्रभावीपणे राबवत शेकडो नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यातही पोलीस दलाला यश मिळाले.
निलोत्पल यांच्या कार्यकाळातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे नक्षल चळवळीतील ‘थिंक टँक’ आणि केंद्रीय समिती सदस्य असलेल्या कुख्यात कमांडर भूपती याचे आत्मसमर्पण. या घटनेमुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.
दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले पोलीस अधीक्षक एम. रमेश हे गडचिरोलीच्या परिस्थितीशी पूर्णपणे परिचित आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) म्हणून काम करताना त्यांनी अनेक नक्षलविरोधी मोहिमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे सातत्य आणि धोरणात्मक स्थैर्य म्हणून पाहिले जात आहे.
सध्या गडचिरोली जिल्हा औद्योगिक विकासाच्या उंबरठ्यावर असून ‘स्टील हब’ म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत ठेवणे, उद्योगांना संरक्षण देणे आणि उर्वरित नक्षली हालचालींचा पूर्णपणे बीमोड करणे, हे आव्हान नव्या पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासमोर असेल.
नव्या नेतृत्वामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्थेला आणखी बळ मिळेल, अशी अपेक्षा विविध स्तरातून व्यक्त होत आहे.
