गडचिरोलीतील लांजेडा परिसरातील खुन प्रकरणात फरार आरोपीला चंद्रपूर न्यायालय परिसरातून अटक.
गडचिरोली:- गडचिरोली शहरातील लांजेडा परिसरात सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास फर्निचरच्या पैशाच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. भर दिवसा घडलेल्या या खुनामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपी फरार झाल्याने काही काळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.मात्र, गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेत अवघ्या 20 तासांच्या आत आरोपीला अटक करून आपल्या कार्यक्षमतेची प्रचिती दिली. महेश महादेव बुरांडे (वय 43) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला चंद्रपूर येथील न्यायालय परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ विविध विशेष पथके तयार करून शोधमोहीम हाती घेतली. आरोपीचे घर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच संशयित ठिकाणांवर पोलिसांची पाळत ठेवण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत वेगवेगळ्या दिशांनी पथके रवाना करून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू होता.
दरम्यान, आरोपी चामोर्शी तालुक्यातील एका गावात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली, मात्र आरोपी तेथून पसार झाल्याचे आढळून आले. आरोपीला काही सहकाऱ्यांकडून मदत मिळत असल्याचा संशय पोलिसांना आल्याने शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली.
तांत्रिक माहिती, लोकेशन ट्रॅकिंग आणि गुप्त माहितीच्या आधारे अखेर आरोपीचे चंद्रपूर येथील लोकेशन निश्चित करण्यात आले. त्यानंतर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी योग्य संधी साधत आरोपीला अटक केली आणि गडचिरोली येथे आणण्यात आले.
मृतक सचिन कोल्हुरवार हा विवेकानंद नगर परिसरातील रहिवासी असून, तो आपल्या काही मित्रांसह आरोपीच्या घरी गेला होता. यावेळी पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट खुनात झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, 2019 साली फर्निचरच्या कामासाठी दिलेल्या पैशांवरून हा वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. आरोपीने ना फर्निचर पूर्ण केले, ना पैसे परत दिले, यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
घटनास्थळावरून पोलिसांनी मृतकाचा एक मोबाईल जप्त केला असून, त्याच्याकडे आयफोन कंपनीचा आणखी एक मोबाईल असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्या मोबाईलचा शोध घेण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे. आरोपीने फरार होताना स्वतःचा मोबाईल बंद केल्यामुळे तपासात अडथळे निर्माण झाले होते, तरीही पोलिसांनी कौशल्याने तपास करत त्याला गाठले.
या प्रकरणातील सर्व पैलूंची सखोल चौकशी करण्यात येत असून, पैशांची नेमकी देणी-घेणी, इतर कोणाचा सहभाग होता का, याचा तपास तांत्रिक पद्धतीने केला जात आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान, मृतकाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अवघ्या 20 तासांत आरोपीला अटक करण्यात यश आल्यामुळे गडचिरोलीकरांनी सुटकेचा श्वास घेतला असून, पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
