अतिदुर्गम बंगाडी येथे नव्या पोलीस मदत केंद्राची स्थापना; सुरक्षा व विकासाला नवी चालना
भामरागड उपविभागातील संवेदनशील भागात २४ तासांत उभारणी; माओवादी कारवायांना आळा घालण्याचा निर्धार
वार्ताहर : गडचिरोली
माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने भामरागड उपविभागांतर्गत बंगाडी येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. हा उपक्रम १९ मार्च २०२६ रोजी गडचिरोली पोलिसांच्या वतीने राबविण्यात आला.
लाहेरी उपपोस्टेपासून सुमारे ८ किमी अंतरावर आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेजवळ असलेल्या या अतिदुर्गम भागात नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणे व विकास प्रक्रियेला गती देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.
विशेष म्हणजे सुमारे १००० सी-६० कमांडो, १८ बीडीडीएस पथके, नव्याने नियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संयुक्त प्रयत्नातून अवघ्या २४ तासांत हे केंद्र उभारण्यात आले.
या मदत केंद्रामुळे स्थानिक नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध होऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच माओवादी हिंसक कारवायांना आळा घालण्यातही हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
उद्घाटन सोहळा विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, CRPF चे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल तसेच CRPF १९२ बटालियनचे कमांडंट परविंदर सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला.
सन २०२३ पासून सुरू असलेल्या सुरक्षा बळकटीकरण मोहिमेअंतर्गत हे ११वे पोलीस मदत केंद्र असून, दुर्गम भागात प्रभावी सुरक्षा जाळे उभारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
