**संस्कार संस्थेचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम
कसुरवाही येथे गरजू महिलांना साडी व ब्लँकेट वाटप,
‘ग्रामनाथ’ प्रकल्पातून शेतकऱ्यांना बहुआयामी मदत**
एटापल्ली | प्रतिनिधी
संस्कार संस्था, एटापल्ली व रोल संस्था, अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत कसुरवाही येथे गरजू महिलांना मोफत साडी व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. थंडीच्या दिवसांत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गरजू महिलांना मोठा दिलासा मिळाला असून संस्थेच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संस्कार संस्था केवळ मदतकार्यापुरती मर्यादित न राहता ग्रामीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेच्या शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘ग्रामनाथ’ प्रकल्पांतर्गत एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरातील शेतकऱ्यांना विविध प्रकारची मार्गदर्शक व तांत्रिक मदत दिली जात आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती देण्यात येत असून, सिंचन योजना, सोलर पंप योजना, पीक विमा योजना आदींसाठी आवश्यक असलेले ऑनलाइन अर्ज शेतकऱ्यांच्या वतीने भरून देण्यात येत आहेत. अनेक शेतकरी ऑनलाइन प्रक्रियेअभावी शासकीय योजनांपासून वंचित राहतात, ही बाब लक्षात घेऊन संस्कार संस्था प्रत्यक्ष गावागावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.
यासोबतच भातशेतीनंतर शेती पडीक न ठेवता दुसऱ्या हंगामात मका पिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. मका पिकाचे फायदे, आधुनिक शेती पद्धती तसेच बाजारपेठेतील संधी याबाबत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जात आहे.
या सर्व उपक्रमांचे समन्वयक म्हणून ग्रामनाथ प्रकल्पाचे श्री गोसू हिचामी हे आपल्या सहकाऱ्यांसह व स्वयंसेवकांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत प्रत्यक्ष शेतावर जाऊन मदत करत आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळू लागला असून ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे.
या कार्यक्रमास श्री अंतू नरोटे (उपसरपंच, कोहका), श्री मनिराम मानसू नरोटे (गाव पाटील, कसुरवाही–ताडगुडा), श्री बारसु नरोटे, श्री राजेंद्र तिरकी, श्री हेर्मोन तिग्गा, श्री शामराव नरोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री विजय संस्कार यांनी ग्रामनाथ प्रकल्पाच्या सेवांचा विस्तार भविष्यात आणखी वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन केले. सामाजिक सेवा व ग्रामीण विकास यांचा सुंदर संगम असलेले हे उपक्रम भविष्यातही समाजाच्या सर्व घटकांसाठी सातत्याने राबविण्यात येतील, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
