अहेरी तालुक्यात महावितरणाच्या मनमानी कारभारा विरोधात नागरिक झाले आक्रमक.
प्रत्यक्ष रीडिंग न करता ‘अंदाजे’ वीज बिले पाठविण्याचा सपाटा.आलापलीच्या कार्यकारी अभियंतांना दिले निवेदन.
अहेरी(गडचिरोली):– आलापल्ली शहर,अहेरी व आजूबाजूच्या परिसरातील पंधरा पेक्षा अधिक गावांमध्ये मागील अनेक महिन्यांपासून घरगुती वीज मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग न घेता महावितरण कडून अंदाजित (Average) वीज बिले पाठविली जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकारामुळे प्रत्यक्ष वापरापेक्षा अधिक वीज बिले येत असून सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.विजेच्या युनिट दरात सातत्याने वाढ होत असतानाच अंदाजित पद्धतीने वीज बिले पाठविणे हे अन्यायकारक असून ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.परिणामी अनेक ग्राहकांना ही वाढीव बिले भरणे अशक्य होत आहे.
तसेच मागील काही महिन्यांपासून अनेक भागात वीज बिले नियमितपणे वाटप होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.वीज बिले न मिळाल्यामुळे ग्राहक वेळेत बिल भरू शकत नसताना,महावितरणचे कर्मचारी थेट वीज पुरवठा खंडित करत असल्याचे प्रकार घडत असून ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात येत आहे.वीज मीटर रीडिंग व बिल वाटपासाठी कंत्राटदारांची नियुक्ती असतानाही संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांकडून कामात हलगर्जीपणा होत असल्याचा फटका थेट नागरिकांना बसत आहे.
या गंभीर प्रकरणाबाबत नागरिकांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत तातडीने प्रत्यक्ष मीटर रीडिंग सुरू करणे, चुकीची अंदाजित वीज बिले दुरुस्त करणे, वीज बिले नियमित वाटप करणे तसेच बिल न मिळाल्यास वीज पुरवठा खंडित करू नये,अशी ठाम मागणी केली आहे. तसेच संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.या वेळेस अमित येणप्रेड्डीवार,साई तुलसीगारी,करीम शेख,शिवम नामनवार,स्वप्नील गड्डमवार,अविनाश अत्राम,अनिश सानप,श्रीनिवास गच्छर्लावार,अंशुल जल्लेवार,सुजित जिल्लाला,तिरुपती वेलादी,चिकू तिवाडे,अमर बोरुले हे उपस्थित होते.
महावितरणने या विषयाकडे तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
