जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेवर काँग्रेसचा झेंडा; सुनील तेलकुंटलवार यांची अविरोध निवड
डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाला यश; सहकार क्षेत्रात काँग्रेसची ताकद वाढली
गडचिरोली | प्रतिनिधी :
गडचिरोली जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक पार पडली असून, काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुनील शंकर तेलकुंटलवार यांची संचालकपदी अविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात काँग्रेसची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
एटापल्ली व भामरागड या दोन तालुक्यांतून एका संचालकाची निवड होणार होती. अ गटातून सुनील तेलकुंटलवार व दशरथ कोल्हा मडावी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, काँग्रेस नेते डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या मध्यस्थीने मडावी यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तेलकुंटलवार यांची अविरोध निवड निश्चित झाली.
या यशस्वी घडामोडीतून कंकडालवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकार क्षेत्रात आपल्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका अधोरेखित केली आहे.
निवडीनंतर डॉ. कंकडालवार यांनी सुनील तेलकुंटलवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत अभिनंदन केले.
या अविरोध निवडीसाठी रमेश वैरागडे (माजी संचालक, कृ.उ.बाजार समिती व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य), संदीप वैरागडे, प्रज्वल नागुलवार, प्रशांत तेलकुंटलवार, कपिल मठ्ठामी, ज्ञानेश मट्टामी, दिनेश नरोटे, अशोक गावंडे, दीपक गावंडे आणि शिवाजी लेखामी यांनी विशेष परिश्रम घेतले.
या अविरोध निवडीमुळे जिल्हा बँकेत काँग्रेसचे वर्चस्व अधिक दृढ झाले असून, आगामी काळात सहकार क्षेत्रात नवीन समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
