स्पर्श समाजसेवी संस्थेचा नवा उपक्रम; जुन्या कुर्माघरांना पर्याय ठरणार नवीन ‘मावा आस्काना लोण’.
सिताटोला येथे आयोगाच्या उपाध्यक्षांकडून पाहणी
गडचिरोली:- ग्रामीण भागात आदिवासी समाजातील महिलांना मासिक पाळीच्या काळात ज्या ‘कुर्माघरा’त राहावे लागते ती घरे अडगळीत, अस्वच्छ आणि आवश्यक सुविधांअभावी असुरक्षित ठरत आहेत. त्याला पर्याय म्हणून सीताटोला या गावात श्रमदानातून उभारलेले ‘मावा आस्काना लोण’ (आपल्या हक्काचे घर) आदर्श ठरत आहे. अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सोमवारी त्याची पाहणी केली. अशा आरोग्य व सुरक्षिततेसाठी सकारात्मक संकल्पनांना शासनस्तरावर पाठबळ देण्याचे सुतोवाच त्यांनी केले. त्यासंदर्भात आदिवासी विकास विभागाकडून विस्तृत आढावा घेतला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम सोमवारी गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी धानोरा तालुक्यातील सीताटोला या गावाला भेट दिली. तेथील जुने कुर्मा घर तसेच स्पर्श या समाजसेवी संस्थेने कुर्माघराला पर्याय म्हणून तयार केलेल्या नवीन ‘मावा आस्काना लोण’ या संकल्पनेतून उभारलेल्या घराची पाहणी केली. स्थानिक महिलांनी स्वतः श्रमदान करून ही घरे उभारली असून स्पर्श संस्थेने त्यांना आवश्यक सहकार्य केले आहे. या उपक्रमाचे ॲड.मेश्राम यांनी कौतुक केले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिलीप बारसागडे तसेच स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
