नागपूर:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी हे परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षेचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे. या वेळापत्रक नुसार महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या माध्यमातून १० नोव्हेंबरला ‘टीईटी’ घेतली जाणार आहे.
परीक्षेनंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना निकालाची प्रमाणपत्रे आता परिषदेतर्फे नव्हे तर स्वतंत्र गोपनीय संस्थेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. ‘टीईटी’ प्रमाणपत्रा तील बोगसगिरी नंतर शासनाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय प्रश्नपत्रिका तयार करणारी व ‘ओएमआर’ उत्तरपत्रिका बनविणारी संस्था या देखील स्वतंत्र आहेत.
शालेय शिक्षण विभागाने २०१३ पासून शिक्षक होण्यासाठी ‘टीईटी’चे बंधन घालण्यात आले. पण, अनेकांनी बनावट प्रमाणपत्रे मिळविल्याची धक्कादायक बाब समोर आली आणि राज्यातील त्याचे संपूर्ण नेटवर्क उघड झाले. त्यानंतर शासनाला ‘टीईटी’ प्रमाणपत्रांची पडताळणी देखील करावी लागली.
या पार्श्वभूमीवर भविष्यात असा प्रकार होवू नये म्हणून आता प्रश्नपत्रिका तयार करणारी संस्था, ओएमआर उत्तरपत्रिका बनविणारी संस्था व प्रमाणपत्रे देणारी संस्था स्वतंत्र करण्यात आल्या आहेत. त्या गोपनीय असून कोणालाही त्याची माहिती होणार नाही, याची खबरदारी शासनाने घेतली आहे. याशिवाय ‘टीईटी’च्या प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले असून परीक्षेचे संपूर्ण रेकॉर्डिंग त्यात होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक परीक्षार्थीची मेटल डिटेक्टर द्वारे तपासणी केली जाणार आहे.