पेरमिलीतील गॅस सिलेंडरची समस्या सोडवा.अन्यथा तीव्र आंदोलन करणार :- सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ गावडे.
अहेरी(गडचिरोली):– मागील काही दिवसांपासून अहेरी तालुक्यातील पेरमिली परिसरात गॅस सिलेंडरचे वितरण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. गरीब कुटुंबे, शेतकरी, मजूर आणि विशेषतः महिलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नसल्यामुळे लोकांना पर्याय म्हणून लाकूडफाटा वापरावा लागत आहे, ज्यामुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात येत आहे.
आजच्या काळात गॅस ही ऐशोआरामाची वस्तू नसून ती एक मूलभूत गरज बनली आहे. तरीही संबंधित गॅस एजन्सी आणि प्रशासन या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केले आहे.
सदर समस्या बाबत नागरिकांनी अनेक वेळा तोंडी विचारणा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप निर्माण झाला आहे. मागणीनुसार परिसरातील नागरिकांना तात्काळ गॅस वितरण सुरळीत करण्यात यावे, नागरिकांना वेळेत सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत आणि या निष्काळजीपणाबद्दल जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.
गॅस सिलेंडर बाबतीत समस्या लवकरात लवकर सोडवला गेला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ गावडे यांनी दिला आहे.
