ऑनलाइन जुगाराकरिता बँकेच्या मॅनेजरने चोरले लॉकरमधील ४ कोटींचे सोने.
ग्राहकांच्या लॉकरवर डल्ला मारणाऱ्या बँकेच्या मॅनेजरला पोलिसांनी केली अटक.
मुंबई:- बँकेच्या ग्राहकांनी विश्वासाने लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने मॅनेजरनेच चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. थोडे थोडके नाही तर ४ कोटी किंमतीच्या २ किलो ७८० ग्रॅम सोन्याच्या दागिन्याची चोरी करण्यात आली होती. यापैकी ७०० ग्रॅम सोने पुन्हा हस्तगत करण्यात आले आहेत. बँकेच्या ३५ वर्षीय मॅनेजरने चोरी केलेले सोने फायनान्स कंपन्यांकडे गहाण ठेवलं. त्यातून मिळालेला पैसा ऑनलाइन जुगार आणि कॅसिनोत उधळला. आता या प्रकरणी पोलिसांनी मॅनेजर किरणकुमार याला अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बंगळुरुतील इंडियन बँकेच्या शाखेत किरणकुमार हा सहाय्यक व्यवस्थापक आहे. त्याने बँकेच्या लॉकरमधील अडीच किलोपेक्षा जास्त सोन्याची चोरी केली. या सोन्याची किंमत आजच्या बाजार भावाने चार कोटी रुपये इतकी आहे. अडीच किलो सोन्यापैकी ७०० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. किरण कुमारला ऑनलाइन जुगार आणि कॅसिनोत जायचं व्यसन होतं. त्यासाठीच त्यानं बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याची चोरी केली.
धक्कादायक बाब म्हणजे किरणकुमारने २ किलो ७८० ग्रॅम सोन्याची चोरी केली तरी याची कुणालाच कुणकुण लागली नाही. शाखा व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांनाही याबाबत संशय आला नाही. सहा महिन्यांपूर्वीच किरणकुमारची गिरीनगर इथल्या शाखेत बदली झाली होती. या सहा महिन्यात त्याने सेफ्टी लॉकरच्या चाव्या मिळवल्या. यानंतर ग्राहकांचे लॉकरमध्ये ठेवलेले दागिने चोरले.
बँकेचा एक ग्राहक त्याचे लॉकरमधील सोने काढायला आला होता. लॉकर उघडताच त्याला धक्का बसला. लॉकरमध्ये सोन्याचे दागिनेच नव्हते. ग्राहकाने थेट पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तेव्हा किरणकुमारच सोने काढत असल्याचं दिसलं. त्याने चोरी केलेले सोने मुथूट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्सकडे गहाण ठेवले होते. चोरी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून बँक व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.
