
नागपूर:- काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील उरण येथे कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. आता नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. किवळा येथील कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अनेक कोंबड्या आणि त्यांची अंडी नष्ट करण्यात आली आहेत. या संदर्भात पशू संवर्धन विभागाने संरक्षणात्मक उपाययोजना सूरू केल्या असून याचा मानवाला संसर्ग झाला नसल्याचे म्हटले आहे. तसेच बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये तसेच अफवा आणि गैरसमज पसरवू येऊ नये असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
लोहा तालुक्यातील किवळा येथील शेतकरी पंजाब टरके यांच्या मोकळ्या कुकुट पालन केंद्रातील कोंबड्याचे २० पिल्ले मृत आढळले होते. पशुसंवर्धन विभागा मार्फत मृत कुकुट पक्षांचे नमुने पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून मृत पिल्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मृत कुक्कुट पक्षांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे किवळा येथील दहा किलोमीटर परिसरात अलर्ट झोन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान तातडीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून ५६५ कुकुट पशुसंवर्धन विभागाने ताब्यात घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
आजूबाजूच्या परिसरात बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये, यासाठी किवळा येथील दहा किलो मीटर क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्रीची दुकाने, अंडी, कुक्कुट मांसाची चिकन दुकाने, वाहतूक, बाजार आणि यात्रा, बंद राहणार अस स्पष्ट करण्यात आले आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत अनावश्यक भीती बाळगू नये. तसेच अफवा, गैरसमज पसरविण्यात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यात कुठे ही असे आढळल्यास नजीकच्या पशु वैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधण्याचे आवाहन पशु संवर्धन अधिकारी राजकुमार पडिले यांनी केले आहे.
👉बर्ड फ्लू म्हणजे काय?
बर्ड फ्लू, ज्याला एव्हियन इन्फ्लूएंझा असेही म्हणतात. हा एक विषाणू आहे जो पक्ष्यांमध्ये वेगाने पसरतो. त्याच्या H5N1 प्रकारामुळे मानवांमध्ये गंभीर संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू प्रामुख्याने संक्रमित पक्ष्यांच्या लाळ, नाकातील स्राव किंवा घाणीच्या संपर्कातून पसरतो.
ढालेगावच्या पोल्ट्री फार्ममध्ये पिल्लांच्या मृत्यूनंतर प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. या पिल्लांच्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा विषाणू केवळ पक्ष्यांनाच नाही तर इतर प्राण्यांना आणि मानवांनाही प्रभावित करू शकतो.
👉शिजवलेले चिकन पूर्णपणे सुरक्षित.
जेव्हा ‘बर्ड फ्लू’ची साथ आली होती त्यावेळी राज्याचे तत्कालिन अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी ‘बर्ड फ्लू’विषयी सर्व अफवांचं निवारण केलं होतं. अंडी व कोंबडीचं मास ७० अंश सेंटिग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्यास विषाणू निष्क्रिय होतो. त्यामुळे अशा पद्धतीने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते. त्यामुळे तुम्ही स्वच्छ स्वयंपाक घरात बनवलेले आणि व्यवस्थित शिजलेले चिकन खाल्ले असेल तर तुम्हाला ‘बर्ड फ्लू’चा धोका नाही. मात्र कच्चे मांस खाल्ले असल्यास त्यासाठी तुम्ही वैद्यकीय तज्ज्ञांकडून मदत घेता येईल