
दोन समजदार ऑटो वाल्यामुळे अनर्थ टळला.
नागपूर:- मुलींकरिता सोळावे वर्ष धोक्याचे, असे म्हटले जाते. तिचेसुद्धा वय वर्षे १६. मुक्काम पोस्ट सुरत, गुजरात. नववीत शिकणाऱ्या कविता (नाव काल्पनिक) चंद्रपूर जिल्ह्यातील फेसबूक फ्रेण्डवर प्रेम जडले. त्याच्यासाठी मागचा-पुढचा कसलाही विचार न करता हाती लागेल तेवढे दागिने बॅगमध्ये कोंबून ती सूरतहून थेट नागपुरात पोहचली. ठरल्याप्रमाणे तो मात्र येथे दिसलाच नाही. त्यामुळे ती कावरीबावरी झाली. अशात तिला दोन समझदार ऑटोवाले भेटले अन् तिचे काळोखात जाऊ पाहणारे भवितव्य सुरक्षित झाले.कविता चांगल्या सधन घरातील मुलगी आहे.घरी साऱ्या सुख-सुविधा, अर्थातच महागडा मोबाईलही सोबतीला अन् कोणतीही रोकटोक नसल्याने मुलगी ऑनलाईन जगताची सैराट सफर करू लागली. अशात चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकाशी तिची फेसबूकवरून ओळख झाली. ती त्याच्या प्रेमात गुरफटली. वयाच्या पुढे जाऊन स्वप्न बघू लागली अन् संधी मिळताच ११ जानेवारी (शुक्रवारी) तिने बॅग भरली. हाती लागले तेवढे सोन्याचे दागिने त्यात टाकले अन् थेट अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये बसली.
१२ जानेवारी(शनिवारी) सायंकाळी नागपूर स्थानकावर उतरल्यानंतर तिची नजर भिरभिरू लागली. फलाटावरील हजारोंच्या गर्दीॅत तिला तिचा ‘तो’ मित्र शोधायचा होता. कारण आधी बोलणी झाल्याप्रमाणे तो तिला रेल्वे स्थानकावर भेटणार होता. गर्दी ओसरली. गाडीही निघून गेली. तो मात्र कुठेच दिसत नव्हता. शेवटी ती फलाट क्रमांक ६ जवळच्या एफओबी जवळ येऊन उभी राहिली. कदाचित तिच्या जवळचे पैसे संपले असावे. ती ऑटोजवळ आली. मोहम्मद शहजाद अब्दुल कलाम (वय २०) आणि बादल सूर्यभान बावणे (वय ३२) यांच्यासोबत तिची बातचित सुरू झाली.
माझ्याकडे सोन्याचे दागिने आहे, ते विकायचे आहे, असे ती म्हणाली. तिच्यासोबत दुसरे कुणीही नव्हते. त्यामुळे शहजाद आणि बादलच्या लक्षात जे यायचे ते आले. त्यांनी प्रसंगावधान राखत थेट रेल्वे पोलिसांना फोन करून या संशयास्पद घटनाक्रमाची आणि मुलीची माहिती दिली. ते कळताच जीआरपीचे ठाणेदार गाैरव गावंडे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. त्यांनी महिला पोलिसांंच्या मदतीने अल्पवयीन कविताला ताब्यात घेतले. तिची विचारपूस केली. ती फारशी काही सांगत नसल्याचे पाहून तिच्या बॅगमध्ये असलेल्या डायरीत असलेल्या तिच्या पालकाच्या मोबाईलवर संपर्क केला. ती शुक्रवारपासून गायब असून गुजरात पोलिसांकडे अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचेही त्यातून स्पष्ट झाले. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन गावंडे यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानुसार, पोलीस अधीक्षक डॉ. प्रियंका नारनवरे यांनी लगेच रेल्वे पोलीस स्टेशन गाठून मुलीला विचारपूस केली. चाैकशीची औपचारिकता पार पडल्यानंतर कविताला मुलींच्या शासकीय वस्तीगृहात दाखल करण्यात आले. तिचे पालक नागपुरात आल्यानंतर तिला त्यांच्या स्वाधिन केले जाणार आहे.
तर काय झाले असते ?
शहजाद आणि बादलने समजदारपणा दाखवला म्हणून कविता बचावली.अन्यथा परप्रांतातील एकटी मुलगी सोन्याचे दागिने घेऊन आहे, असे कळताच कुण्याही समाज कंटकाची मती फिरली असती. असे झाले असते तर मोठा अनर्थ घडला असता.मात्र, शहजाद आणि बादलच्या सदविवेक बुद्धीमुळे कविताचे भवितव्य सुरक्षित झाले.