दुर्गम गडचिरोलीत इतिहास! तुमरकोठी–अहेरी मार्गावर पहिल्यांदाच धावली बस सेवा
भास्कर फरकडे/उपसंपादक
📍 गडचिरोली | दि. 17/03/2026
गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या सहकार्याने अतिदुर्गम तुमरकोठी ते अहेरी मार्गावर आज पहिल्यांदाच बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर तब्बल 79 वर्षांनी या भागातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाली आहे.
भामरागडपासून सुमारे 30 किमी आणि अहेरीपासून 100 किमी अंतरावर असलेल्या तुमरकोठी, तोयनार, मुरुमभुशी व आसपासच्या गावांसाठी ही सेवा जीवनरेखा ठरणार आहे. बस गावात पोहोचताच नागरिकांनी पारंपरिक वाद्य, नृत्य आणि जल्लोषात तिचे स्वागत केले. शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकवत आनंद व्यक्त केला.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे तुमरकोठीचे प्रभारी अधिकारी गोरखनाथ सुरासे यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. उद्घाटन सोहळ्यात ग्रामस्थ, शिक्षक व सुमारे 300 नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बससेवेचा लाभ सुमारे 450 ते 500 नागरिकांना होणार असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच नागरिकांच्या दळणवळणासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. वर्षानुवर्षे पायपीट करून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत आहे.
गडचिरोली पोलीस दलाने यापूर्वीही दुर्गम भागात 559 मोबाईल टॉवर्स, 424 किमी रस्ते आणि 65 पूल उभारणीस मदत केली असून विविध नवीन बसमार्ग सुरू करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.
