माजी जि.प. अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांचा मदतीचा हात
इंदाराम येथील कोरेत कुटुंबाला सांत्वन भेट; तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत
अहेरी : प्रतिनिधी
अहेरी तालुक्यातील इंदाराम गावातील बाबुराव कोरेत यांच्या दुःखद निधनानंतर कोरेत कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या या कुटुंबाने अंत्यविधी कार्यक्रम कसेबसे पार पाडले, मात्र पुढील तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या परिस्थितीची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. अजय कंकडालवार यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला.
स्थानिक कार्यकर्त्यांकडून बाबुराव कोरेत यांच्या निधनाची व कुटुंबाच्या आर्थिक अडचणीची माहिती मिळताच डॉ. कंकडालवार यांनी कोरेत कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांच्या दुःखात सहभागी होत तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत देऊन आधार दिला.
यावेळी डॉ. कंकडालवार यांनी कोरेत कुटुंबीयांना धीर देत, “कोणत्याही अडचणीच्या वेळी आपण सदैव तुमच्या पाठीशी आहोत,” असे सांगत कुटुंबाला मानसिक बळ दिले. त्यांच्या या सहकार्यामुळे कोरेत कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
या प्रसंगी माजी जि.प. सदस्य अजय नैताम, राकेश सडमेक, कालिदास आत्राम, संदीप कोरेत, श्रीनिवास मडावी, दादाराम नैताम, सिताराम आत्राम, दिवाकर आत्राम, प्रवीण कोरेत यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
