गुरुपल्ली ग्रामपंचायतीचा आदर्श विकास मॉडेल : अधिकारी संध्या गेडाम यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा
एटापल्ली तालुक्यातील गुरुपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांमुळे ग्रामपंचायतीने शाश्वत विकासाचा आदर्श निर्माण केला असून ग्रामपंचायत अधिकारी कुमारी संध्या गेडाम यांच्या उत्कृष्ट कार्याची सर्वत्र दखल घेतली जात आहे.
या अभियानांतर्गत सहा गावांतील शाळा व अंगणवाडी येथे सुंदर परसबागांची निर्मिती करण्यात आली असून बोलक्या भिंती व बाला पेंटिंगद्वारे शैक्षणिक वातावरण आकर्षक करण्यात आले आहे. श्रमदानाच्या माध्यमातून गुरुपल्ली ते डुम्मे शेत पांदण रस्ता तब्बल दोन किलोमीटरपर्यंत तयार करण्यात आला आहे. याशिवाय चार वनराई बंधारे उभारण्यात आले असून जलसंधारणालाही चालना मिळाली आहे.
शाळा व अंगणवाडी येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ग्रामपंचायत कार्यालयाची रंगरंगोटी करून बगीचा व परसबाग तयार करण्यात आले आहे. अभियान काळात १००% घरकुल बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्पही प्रगतीपथावर आहे. पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सोलार संचासाठी लाभार्थ्यांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
प्रत्येक गावात क्रीडांगण व ग्रंथालय उभारण्यात आले असून नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जवेली गावातील मामा तलावाचे श्रमदानातून खोलीकरण करण्यात आले आहे. नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड, विविध ओळखपत्रे काढणे, आरोग्य शिबिरे, तसेच घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
तसेच प्रवासी निवारा शेडचे बांधकाम व सुशोभीकरण, उमेद अभियानांतर्गत कार्यालयाची रंगरंगोटी, आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी शुद्धीकरण यंत्रणा बसवून गावकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतीने व्यसनमुक्ती, हुंडाबंदी, बालविवाह प्रतिबंध, प्लास्टिक बंदी व स्वच्छता यासंदर्भात ठराव घेऊन समाजप्रबोधनाचे कार्यही प्रभावीपणे राबवले आहे.
ग्रामपंचायत अधिकारी संध्या गेडाम, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांनी गावाच्या सातत्यपूर्ण शाश्वत विकासाचा संकल्प केला असून ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष नरेश मडावी व सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला गुरुपल्ली पंचक्रोशीतील तसेच एटापल्ली तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून लॉर्ड्स मेटल्स कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
