नात्यातील भिन्न प्रवृत्तीचे दर्शन घडविणारे: गणराज नाट्य मंडळाचे ‘ लाडकी बहीण ‘ नाटक
प्रा.राजकुमार मुसणे,
नाते हा कुटुंबाचा आधार,आपुलकीचे, जिव्हाळ्याचे, आत्मीयतेचे कुटुंबातील बहीण -भावाचे रक्ताचे नाते दिवसेंदिवस दृढ होत जावे, हीच अपेक्षा असणारे ;परंतु जिथे स्वार्थाचा शिरकाव होतो ,तिथे तेढ निर्माण होत नाते दुभंगले जातात . परिणामी वितुष्ट निर्माण होऊन टोकाची भूमिका घेत नातेच संपुष्टात येत असतील तर काय मिळविले? , या समकालीन कौटुंबिक प्रश्नाशी निगडित आशयाचे ‘लाडकी बहीण ‘ नाटकातून दर्शविले आहे.
गणराज कला मंदिर वडसा प्रस्तुत अनिल उट्टलवार निर्मित ,पंकेश मडावी लिखित, राजेश चिटणीस व आसावरी नायडू दिग्दर्शित महाराणा प्रताप नाट्य कला मंडळ पिंपळखुट आयोजित संगीत तीन अंकी नाटक ‘लाडकी बहीण’ चा 30 डिसेंबरला यशस्वी प्रयोग झाला .गणराज नाट्य रंगभूमीचे भामटा,लाडकी बहीण, खतरनाक, करंडा कुंकवाचा ,भिकारी, सांभाळ लक्ष्मी कुंकवाचा धनी, दगाबाज , कसाई या नाटकांचे यावर्षी प्रयोग होत आहेत.
‘लाडकी बहीण ‘ या नाटकात दोन परिवारातील रक्ताच्या नात्यातील भाऊ- बहिणीचे भिन्न पद्धतीचे प्रेम व मानलेल्या बहिणीचे भावावरील अस्सल प्रेम याचे दर्शन होते. श्याम- साधना, दुर्गा -प्रशांत ,श्याम- आशा अशा तिहेरी नात्यातील भिन्न -भिन्न प्रवृत्तीच्या बहीण -भावाच्या विलक्षण नात्याचे दर्शन घडते.
कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगार श्याम जुमडे यांच्या जीवनाशी निगडित कथानक आहे. आई-वडिलांचे छत्र हरवल्यानंतर बहीण साधनाचे तो संगोपन करीत सोनेरी स्वप्न साकारण्यासाठी कोळशाच्या खाणीत काम करतो. स्वाभिमानी श्याम, काहीही झाले तरी शेती विकायची नाही असा ठाम निश्चयी श्याम,कोळशाच्या खाणीत कामावर असताना भुसुरुंग स्फोटात जखमी होतो. कोळशाच्या धुळीमुळे सिलीकोसीस सारख्या भयंकर आजाराने श्याम ग्रस्त होतो .व्यभिचारीपणाचा कलंक लागल्याने पश्चातापाच्या झळा सोसणारा श्याम उद्विग्न होतो.
एक कुटुंब श्यामचे तर दुसरे दुर्गाचे अशा दोन कुटुंबाची कहाणी लाडकी बहीण नाटकातून दर्शविली आहे . श्याम- साधना यांच्याप्रमाणेच आई-वडिलांच्या निधनानंतर पोरकी झालेली दुर्गा आणि तिचा सावत्र भाऊ प्रशांत या दोघांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे .वडिलांनी खाणीच्या उद्योग मुलांच्या नावे केल्यामुळे आंतरिक त्रस्त असलेली दुर्गा देशमुख कटकारस्थानाने सर्व संपत्ती आपल्या नावे करण्याकरिता प्रयत्न करते. कौशल्याने दुर्गाने व्यवसाय वाढविलेला असूनही आपण पूर्ण मालक नसल्याची खंत तिला बोचते. त्यासाठीची तिची धडपड सुरू होते.
विराज हा साधनावर एकतर्फी प्रेम करतो. तिची छेड काढल्यामुळे भर चौकात ती त्याचा अपमान करून पोलीस स्टेशनला तक्रार केल्यामुळे त्याला सहा महिन्याची तुरुंगवास भोगावा लागतो. विराज सुडाच्या भावनेतून साधनाला त्रास देत असतो.
ममतेचा सागर तू सुखाची सावली आई परी तू ताई माझी माऊली असे म्हणत प्रशांत दुर्गावर विशेष प्रेम करतो .पुढे इलेक्ट्रिकचा पावर प्लांट उभा करण्यासाठी पैसे देत सर्व फाईलवर स्वाक्षऱ्या करतो.
गर्भाशयाच्या कॅन्सरने पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतरही दुर्गाशी विवाह करणारा अविनाश राणा हे या नाटकातील प्रमुख पात्र आहे. महाविद्यालयीन जीवनातील ओळख व प्रेम यातून साधनाला आपल्या पाशात अडकवत तिला दुष्कृत्य करण्यास भाग पाडून साधनाच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांना दिलेल्या धोक्याचा बदला चलाखीने घेत सर्व संपत्ती हस्तंगत करतो.
बहिणीच्या सुखासाठी धडपडणारा प्रामाणिक करारी श्याम (अधीर कुमार ), भावासाठी जीवाचा आकांत करणारी साधना (राणी कोटांगले), एमबीए उच्च शिक्षण घेत बहिणीवर प्रचंड प्रेम करणारा
प्रशांत (देवा बोरकर ), सर्व संपत्ती अस्तंगत करण्याकरिता हपापलेला कावेंबाज ,धूर्तअविनाश (राजेश चिटणीस ),कटकारस्थानी ,गुंड प्रवृत्तीचा अत्याचारी विराज (सोनू भांडे)
प्रामाणिक नोकर दत्तू (अविन सिडाम) , विनोदवीर
फुटाण्या ( चंद्रशेखर लेन्झे ), आई-वडिलांच्या मृत्यूनंतर कौशल्याने कंपनी चालवणारी परंतु अविनाशच्या सांगण्यानुसार वर्तन करणारी
दुर्गा (आसावरी नायडू),रक्ताच्या नात्यापेक्षाही पवित्र बहीण भावाचे नाते जपणारी जिव्हाळ्याने वागणारी आशा वर्कर (अंजली गादे) या प्रमुख पात्राच्या माध्यमातून नाटककाराने बहिण भावाच्या नात्यातील विविध पदर घटना- प्रसंगातून उलगडले आहेत. स्वार्थ, अत्याचार, शोषण, व्यसनाधीनता, हवे ते मिळविण्यासाठी वाटेल ते करण्याची टोकाची भूमिका नाटकातून दर्शविली आहे.
‘छेडल्या तारा छेडल्या भावना’, ‘ सरगम छेडताना गीत आले ओठी’, ‘ ममतेचा तू सागर सुखाची सावली आई परी ताई माझी माऊली’, ‘तुझ्या अशा वागण्याने प्रेम दिवाना झालोय गं ‘, कृष्णा न केलं राधेवरती तसेच प्रेम करतो’, गहिवरला हा मंडप सारा ‘अशा सुमधुर गीत गायनाने तसेच ‘तुम्हासाठी केला शृंगार व इष्काची मैफिल सजली’लावणीने प्रेक्षक तल्लीन होतो.तद्वतच शाब्दिक व प्रासंगिक विनोदाने प्रेक्षक खुश होतात.तारकाटे, दमदाटे ,फलकवने,मानमोडे, सेकंड हॅन्ड, ओव्हरलोड ,मीटर, फेज अशा शाब्दिक कोट्यातून विनोद निर्माण करीत विनोदवीर चंद्रशेखर लेंझे,अंजली गादे व अविन सिडाम प्रेक्षकांना हसवितात.
नाटकातील संवाद ‘इश्क के जंजीर से….फकीर अविनाश से अविनाश राणा’, दुर्गा :’ बाय हुक बाय क्रूक ‘ सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत.आशाचा ‘ या अभागी बहिणीला भावाचे अश्रू पुसण्याचा अधिकार नाही का ?हा उपस्थित केलेला प्रश्न अंतर्मुख करणारा. साधना भाऊ शामला राखी न बांधता अपमानास्पद बोलून लाथा मारत घराच्या बाहेर हाकलते.अविनाश लैलाचा खून करतो .दुर्गा अविनाशला घरातून हाकलते त्यावेळी अविनाश आणि दुर्गा दोघेही एकमेकांना चाकू खूपसून मारतात. स्वार्थाचा अतिरेक केल्यास स्व अस्तित्वही गमवावे लागते, हा संदेश नाटकातून दिलेलावआहे..शेती गमावल्यानंतर श्यामला मंदिरासमोर भीक मागावे लागते ,ही व्यथा नाटकातून प्रत्ययकारीपणे दर्शविली आहे.
तबला नरेश निकुरे , आर्गन योगेश लाटेलवार , अखिल गेडाम ऑक्टोपॅड यांची उत्तम संगीतसाथ ,हिमांशू साऊंड सर्विसची ध्वनी व्यवस्था ,संजय बोरकरचे प्रयोग सहाय्य यामुळे नाटकात रंगत आली.
एकूणच स्वकेंद्री मनोवृत्तीमुळेआपुलकीचे ,प्रेमाचे नाते आटत चालल्याचे नाटकातून दर्शविले आहे.
कौटुंबिक नात्यात होत जाणारे बदल व विसंगती,
विराजची कबड्डी, प्रशांतचे गायन, अविनाशचां जबरदस्त अभिनय, श्याम जुमडेची पाण्यासाठीची तडफड अस्वस्थपणा, साधनाचा नाते टिकविण्याचा आटापिटा ,दत्तूची व्हिडिओ हुशारी, लैलाचां स्वच्छंदीपणा, दुर्गा देशमुखचा वाचिक अभिनय अनुभवण्यासाठी हे नाटक पाहायला हवे.
प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली