भरधाव वेगाने चालणाऱ्या अवजड वाहनामुळे गडचिरोलीतील पोलिसही असुरक्षित?
गडचिरोली–धानोरा मार्गावर भरधाव टिप्परची C-60 वाहनाला धडक.
वेगवान अवजड वाहनांचा कहर; वेगवान वाहनांवर लगाम लावणार कोण?
गडचिरोली : जिल्ह्यात भरधाव वेगाने चालणाऱ्या अवजड वाहनामुळे अनेकाचे जीव जाण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र या भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनाने जिल्ह्यातील पोलिसांना सुद्धा सोडले नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
गडचिरोली–धानोरा मार्गावर पोर्ला किटाळी गावाजवळ भरधाव टिप्पर ट्रकने C-60 पथकाच्या बुलेटप्रूफ वाहनाला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने वाहनातील 10 जवानांचा जीव थोडक्यात बचावला असून मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली ते धानोरा मार्गावर सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या ठिकाणी गिट्टी खाली करून संबंधित टिप्पर वाहन पाचगाव (नागपूर)कडे परत जात होते. दरम्यान अचानक समोर आलेल्या दुचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने टिप्पर उजव्या बाजूला वळवला. त्याच वेळी समोरून येत असलेल्या C-60 पथकाच्या बुलेटप्रूफ वाहनाला त्याची जोरदार धडक बसली.
धडक देणाऱ्या टिप्परचा वेग अत्यंत जास्त असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. टिप्परने बुलेटप्रूफ वाहनाच्या चालकाच्या बाजूच्या मागील चाकाला जोरदार धडक दिल्याने वाहनाचा टायर पूर्णपणे फुटला. इतकेच नव्हे तर टायरचा लोखंडी डिस्कही वाकून गेल्याचे दिसून आले. धडकेची तीव्रता इतकी होती की टिप्पर वाहनाच्या समोरील टायरचे दोन नट-बोल्टही जागेवरून निघून गेल्याचे समोर आले.
या धडकेमुळे C-60 वाहनाचा मागील टायर फुटल्याने वाहन काही क्षण अनियंत्रित झाले आणि पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या खालच्या भागात उतरले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे सर्व जवान सुरक्षित बचावले.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी C-60 पथकातील जवान दिवस-रात्र जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात. मात्र जिल्ह्यातील रस्त्यांवर वाढलेली अवजड वाहनांची वर्दळ, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि वाहतूक व्यवस्थेतील अनियमितता यामुळे जवानांसह नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात खनिज, लोखंड आणि इतर मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात टिप्पर व ट्रकची वाहतूक सुरू असून अनेक रस्ते अरुंद असल्यामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे. परिणामी पोलीस व सुरक्षा दलांनाही प्रवास करताना जीव धोक्यात घालावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
आजच्या घटनेत वाहन बुलेटप्रूफ असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणावे, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करावी आणि संवेदनशील मार्गांवर विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
