गडचिरोलीत इंधन टंचाईचा फटका; डबक्यांमध्ये डिझेल न मिळाल्याने शेतकरी हवालदिल!
गडचिरोली : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सध्या पेट्रोल व डिझेल टंचाईचे गंभीर चित्र पाहायला मिळत असून, विशेषतः चामोर्शी व इतर तालुक्यातील शेवटच्या टोकावर राहणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेट्रोल पंपांवर वाहनांमध्येच इंधन भरण्याचा नियम कडक करण्यात आल्यामुळे डबकी, टॅंक किंवा इतर भांड्यांमध्ये डिझेल देणे पूर्णतः बंद करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढले आहेत.
जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा तुटवडा असून, जेथे इंधन उपलब्ध आहे तेथेही प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, दुर्गम भागातील शेतकऱ्यांना वेळेत डिझेल मिळत नसल्याने त्यांच्या शेतीकामावर थेट परिणाम होत आहे.
विशेषतः ज्या शेतकऱ्यांकडे सोलर किंवा वीज पंप उपलब्ध नाहीत, ते पारंपरिक डिझेल पंपावर अवलंबून आहेत. मात्र, सध्याच्या निर्बंधांमुळे या शेतकऱ्यांच्या भाजीपाला व इतर पिकांवर संकट ओढवले असून अनेक पिके अक्षरशः शेवटचा श्वास घेत आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी माननीय आमदार मिलिंद भाऊ नरोटे, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन सर्व पेट्रोल पंपांवरून शेतकऱ्यांना डबकी किंवा टॅंकमध्ये डिझेल व पेट्रोल उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
“शेतकऱ्यांचे प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने तत्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे, अन्यथा मोठ्या प्रमाणात शेती नुकसान होण्याची शक्यता आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
