बुर्गी येथे वीर बाबुराव शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचे हस्ते लोकार्पण; आदिवासी एकतेचे आवाहन
एटापल्ली : तालुक्यातील बुर्गी येथे वीर बाबुराव शेडमाके गोटूल समितीच्या वतीने क्रांतिकारक वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मंगळवारी (दि.७) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सोहळ्याचे लोकार्पण माजी मंत्री डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील शेकडो ग्रामस्थ, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
पारंपरिक व सांस्कृतिक वातावरणात पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. उपस्थितांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या शौर्यपूर्ण कार्याची आठवण करून त्यांना अभिवादन केले. या सोहळ्यामुळे परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
यावेळी बोलताना डॉ. धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, वीर बाबुराव शेडमाके हे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असून त्यांचे शौर्य, त्याग आणि संघर्ष हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्रत्येक गावात त्यांच्या पुतळ्यांची उभारणी झाली पाहिजे. यासाठी समाजाने एकजुटीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आदिवासी बांधवांच्या हक्कांबाबत बोलताना त्यांनी वनपट्टे व सनद पट्टे देण्याच्या कामाला प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून वनहक्क व जमिनीच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला तनुश्रीताई आत्राम (युवती जिल्हाध्यक्षा तथा सिनेट सदस्य), हर्षवर्धनरावबाबा आत्राम, घोसु हिचामी (गाव पाटील), रविंद्र ओल्लालवार (माजी जि.प. अध्यक्ष), नंदुभाऊ नरोटे (माजी जि.प. सदस्य), संभा हिचामी, संजय चारडूके (माजी जि.प. सदस्य), नागेश मडावी (अहेरी तालुका अध्यक्ष) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वीर बाबुराव शेडमाके गोटूल समिती, बुर्गी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर उपस्थितांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
