डॉ. दिवाकर मारकवार यांचे निधन
जून्या प्रथांना बगल देऊन केले अंत्यसंस्कार
आरमोरी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य काॅ. अमोल मारकवार यांचे वडील डॉ. दिवाकर मारकवार यांचे शुक्रवार दिनांक ९ जानेवारी रोजी पहाटे ३.३० वाजता वृध्दापकाळातमुळे निधन झाले. मारकवार परिवाराने जून्या चालीरीतींना बगल देत आरमोरी येथील गाढवी नदीकाठावरील दहनभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार पार पडले.
गडचिरोली जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य केंद्रात त्यांनी आपल्या वयाची ३० वर्षे सेवा दिली. मृत्यूसमयी ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा काॅ. अमोल मारकवार, एक मुलगी, नातवंडे आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. कम्युनिस्ट विचारसरणीचे असलेल्या मारकवार परिवाराने अंत्यसंस्काराचे मुंडन – तेरवी सारखे जून्या चालीरीतीप्रमाणे सोवळे न करता त्याबदल्यात दहनभूमीच्या साफसफाईचे काम करण्यासाठी आरमोरी नगर परिषदेला २२ हजार रुपये देवून अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले.
अंत्यसंस्कारा दरम्यान शिक्षण महर्षी भाग्यवानजी खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली शोक सभा घेऊन त्यांच्या प्रामाणिक कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काॅ. डॉ. महेश कोपूलवार, काॅ. देवराव चवळे, काॅ. विनोद झोडगे, शिवसेनेचे नेते हेमंत जंबेवार, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, प्रहारचे जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक, चंदू पारखी पाटील मारकवार, काशिनाथजी शेबे, निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सहारे, वामनराव सावसागडे, चंदू वडपल्लीवार, सत्यनारायण चकीनारपवार, राजूभाऊ मारकवार, महेश तितीरमारे, सुधीरभाऊ माटे, विनोद मडावीविजय वाकडे, केशव बांबोळे, संजय वाकडे, प्रशांत खोब्रागडे यांचेसह अनेकांनी संवेदना व्यक्त केल्या.
