पुसदमध्ये सिलिंडरचा काळाबाजार; एकाच घरातून ४० गॅस सिलेंडर जप्त. भरारी पथकाची मोठी कारवाई.
जया लाभसेटवार
उपसंपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स न्यूज पोर्टल
यवतमाळ:- आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची संधी साधून त्याची बेकायदेशीर साठवणूक सुरू करण्यात आली आहे. भरारी पथकांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये छापा टाकून ४० सिलिंडर जप्त केले. त्यामुळे सिलिडरचा काळाबाजार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये एका घरातून ४० गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. एका घरात या सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. याविषयीची माहिती मिळताच भरारी पथकाने पुसदमधील नूर कॉलनीतील सुभाष वॉर्ड येथील आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरावर छापा टाकाला. त्यांना सिलिंडरचा मोठा साठा एका खोलीत ठेवल्याचे आढळून आले. पुसद पोलिसांनी अरिफ कच्ची याच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलमाखाली गुन्हे दाखल करून अटक केली आहे. आरोपीने हे सिलिंडर कुठून आणले त्याची चौकशी पोलिस करीत आहेत.
