न्यायालयाच्या आदेशानुसार मोठी कारवाई : 157 गुन्ह्यांतील लाखो रुपयांचा दारू मुद्देमाल नष्ट
राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांचा संयुक्त ऑपरेशन, जेसीबीच्या सहाय्याने नाश
चामोर्शी (प्रतिनिधी) :
चामोर्शी येथील मा. JMFC न्यायालयाच्या आदेशानुसार प्रलंबित गुन्ह्यांमधील मुद्देमाल नाश करण्याची मोठी कारवाई आज दिनांक 03/03/2026 रोजी पार पडली. न्यायालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही मोहीम राबवून एकूण 157 गुन्ह्यांतील मुद्देमालाचा नाश करण्यात आला.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक गडचिरोलीचे प्र. निरीक्षक श्री. शु. ले. चौधरी तसेच पोलीस स्टेशन आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण प्रक्रिया दोन पंचांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली.
न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेला देशी व विदेशी दारूचा मोठा साठा, ज्याची एकूण किंमत सुमारे रु. 25,50,040/- इतकी होती, तो जेसीबीच्या सहाय्याने पूर्णपणे नष्ट करण्यात आला. या वेळी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ही कारवाई बेकायदेशीर मद्यविक्री व साठवणुकीविरोधात प्रशासनाची ठोस भूमिका दर्शवणारी असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा संदेश यामधून देण्यात आला आहे.
प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, भविष्यातही अशा संयुक्त मोहिमा राबवून अवैध धंद्यांवर आळा घालण्याचा निर्धार अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
