गडचिरोलीत लॉयड्सकडून जीडीपीएल स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा.
गडचिरोली:- गडचिरोलीमध्ये स्थानिक तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड द्वारे आयोजित क्रिकेट स्पर्धा आहे, जी फेब्रुवारी २०२५ मध्ये रवी शास्त्रींच्या हस्ते सुरू झाली होती,परंतु पोलीस भरतीमुळे काही संघांना तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून २०२६ मध्ये ती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिक तरुणांच्या करिअरच्या आकांक्षांना सर्वोच्च प्राधान्य देत, ‘लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड’ ने या वर्षासाठी ‘गडचिरोली जिल्हा प्रीमियर लीग’ अधिकृतपणे स्थगित करण्याची घोषणा केली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवार, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नेतृत्वाने व्यक्त केलेल्या चिंतांची सखोल दखल घेत कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे कंपनीने कळविले आहे.
ही स्थगिती प्रामुख्याने आगामी पोलीस भरती प्रक्रियेची तयारी करणार्या स्थानिक उमेदवारांच्या प्रतिसादानंतर देण्यात आली आहे. यातील अनेक तरुण आपल्या शारीरिक तयारीसाठी आणि सरावासाठी याच मैदानावर अवलंबून आहेत, जे स्पर्धेसाठी निश्चित करण्यात आले होते. स्पर्धेच्या वेळापत्रकामुळे तरुणांच्या या सरावात अडथळा निर्माण होऊन त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन लॉयड्सने समाजहितासाठी पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर आपले मत व्यक्त करताना लॉयडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन म्हणाले की, हा निर्णय ‘जड अंतःकरणाने’ परंतु स्पष्ट उद्दिष्टे समोर ठेवून घेतला आहे.
जीडीपीएलला एक मोठे व्यासपीठ बनवण्याचे आमचे स्वप्न.
प्रभाकरन पुढे म्हणाले, ‘गडचिरोलीच्या दारात राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा अनुभव आणण्यासाठी जीडीपीएलला एक मोठे व्यासपीठ बनवण्याचे आमचे स्वप्न होते. मात्र, आमच्या स्थानिक तरुणांची स्वप्ने आणि त्यांचे करिअर आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. पोलीस भरतीसाठी हे तरुण याच मैदानावर किती मेहनत घेत आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. कपिल देव आणि मीका सिंग यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीत होणारा हा भव्य सोहळा स्थगित करणे वेदनादायी असले, तरी तरुणांच्या व्यावसायिक भविष्याशी आम्ही तडजोड करू शकत नाही असेही ते म्हणाले.लॉयड्सने या स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक परवानग्या आधीच मिळवल्या होत्या. तसेच पायाभूत सुविधा, नियोजन आणि सेलिब्रिटींच्या करारावर मोठी गुंतवणूक केली होती. या खर्चाचा विचार न करता, कंपनीने समुदायाच्या दीर्घकालीन हिताला प्राधान्य दिले आहे.लॉयड्स व्यवस्थापनाने पोलीस भरतीची तयारी करणार्या सर्व उमेदवारांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या असून गडचिरोलीच्या प्रगतीसाठी आपले योगदान सुरूच ठेवण्याचा पुनरुच्चार केला आहे.
