गॅस दरवाढीविरोधात NSUI चा एल्गार; गडचिरोलीत विद्यार्थ्यांचे आक्रमक आंदोलन
सिलेंडर दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी • तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त • प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप
गडचिरोली, दि. 20 मार्च :
घरगुती गॅस सिलेंडरच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले असून, अलीकडील सुमारे 60 रुपयांच्या दरवाढीने संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर NSUI गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आले.
गॅस दरवाढीमुळे सामान्य कुटुंबांचे मासिक बजेट विस्कळीत झाले असून, गृहिणींसह हॉटेल व्यावसायिक, लहान दुकानदार आणि विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसत आहे. याशिवाय घरगुती व व्यावसायिक गॅसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील अनेक नाश्त्याची दुकाने बंद पडण्याच्या स्थितीत आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर गॅस तुटवड्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून, स्थानिक माध्यमांनीही हा मुद्दा वारंवार मांडला आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची तीव्र टीका आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान “नरेंद्र गायब, देशातून सिलेंडर गायब” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री Hardeep Singh Puri यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून गॅस दरवाढ तात्काळ मागे घेण्याची आणि गॅसचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी केली.
NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे म्हणाले, “सामान्य नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचवणारी ही दरवाढ असह्य असून ती त्वरित मागे घेतली पाहिजे.”
या आंदोलनात NSUI चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
