जयाताई लाभसेटवार
उपसंपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स.
गोंदिया:- विस हजार रुपयाची लाच रक्कम मागणी केल्या प्रकरणी वनरक्षक व वन मजूर हे दोघे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने सडक अर्जुनी वन विभागात खळबळ उडाली आहे
तक्रारदार पुरुष वय 46 वर्ष, रा. भोंडकीटोला (दल्ली) ता. सडक अर्जुनी असे असून आरोपी नामे – तुलसीदास प्रभुदास चौव्हाण वय 34 वर्ष, वनरक्षक, क्षेत्र सहायक रेंगेपार अंतर्गत दल्ली बीट, ता. सडक अर्जुनी. देवानंद चपटू कोजबे वय 58 वर्ष, वनमजुर नेमणूक दल्ली बीट रा. खजरी डोंगरगाव ता. सडक अर्जुनी असे आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहिती नुसार, लाच मागणी रक्कम 20 हजार रुपये असून तडजोडी अंति 10 हजार रुपये देण्याचे ठरले यातील पहिला हप्ता 5 हजार रुपये स्वीकारताना एसीबी च्या टीम ने पकडले असून दोन्ही आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 20 सप्टेंबर रोजी करण्यात आली असून घटनास्थळ दल्ली गावा जवळील जंगल आहे.
तक्रारदार यांची शेती दल्ली शिवारात वन जमीन लगत असून दोन आठवड्यापुर्वी तक्रारदार यांनी शेतालगतच्या वन जमिनीतील झाडे झुडपे तोडून शेती करण्याकरीता जमीन साफ केली होती. दिनांक 13 सप्टेंबर रोजी आरोपी तुलसीदास प्रभुदास चौव्हाण याने तक्रारदार यांना फोन करून सडक अर्जुनी येथे बोलावून त्यांना शासकीय वन जमिनीवरील झाडे झुडपे तोडून अतिक्रमण केल्याबाबत नोटीस दिली व त्यानंतर आरोपी तुलसीदास प्रभुदास चौव्हाण याने शासकीय वन जमिनीवरील झाडे झुडपे तोडल्याबाबत कारवाई न करण्याकरता तक्रारदाराकडे 20 हजार रुपये रकमेची लाच मागितली. त्याबाबत तक्रारदाराने ला. प्र. वि. गोंदिया येथे तक्रार दिली होती.
लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी तुलसीदास प्रभुदास चौव्हाण याने पंचासमक्ष 20 हजार रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडी अंती दहा हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. सापळा कारवाई दरम्यान आरोपी याच्या सांगण्यावरून आरोपी देवानंद चपटू कोजबे याने लाच रकमेतील लाचेचा पहिला हप्ता 5 हजार रुपये तक्रारदार कडून स्वीकारला. दोन्ही आरोपींना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सापळा कारवाई विलास काळे पोलीस उप अधीक्षक, पो.नी. राजीव कर्मलवार, पो.नि. उमाकांत उगले, स.फौ. चंद्रकांत करपे, मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, मनापोशी संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांनी केली आहे.