आरोग्य विभाग आणि पोलीस दलाचा अनोखा उपक्रम.
पेरमिली येथे ‘आरोग्य दूतांचा’ शाही सन्मान.
पेरमिली (गडचिरोली): दुर्गम भागात अहोरात्र आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य स्वयंसेविकांच्या समर्पित कार्यामुळेच प्राथमिक आरोग्य केंद्र, पेरमिलीला महाराष्ट्र शासनाचा मानाचा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. या यशाचे खरे मानकरी हे ‘आरोग्य दूत’ आहेत, असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल कुकुडकर यांनी केले.
उप पोलीस स्टेशन पेरमिली आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पेरमिली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष स्नेह मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी अधिकारी पो. उप. नि. दीपक सोनूने, पो. उप. नि. मुकेश दासगावकर (SRPF गट ११) आणि डॉ. गणेश मडावी उपस्थित होते.
मनोरंजनातून विरंगुळा आणि प्रबोधन
दैनंदिन कामाच्या व्यापातून या आरोग्य दूतांना थोडा विरंगुळा मिळावा, या उद्देशाने कार्यक्रमाची सुरुवात ‘आशा’ या प्रेरणादायी मराठी चित्रपटाने करण्यात आली. चित्रपटानंतर मैदानात विविध खेळांची रंगत चढली. यामध्ये सॅक जंप, चमचा-गोळी, बलून पिरामिड आणि संगीत खुर्ची अशा स्पर्धांमध्ये सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. केवळ खेळच नव्हे, तर कामावर आधारित प्रश्नमंजुषा घेऊन त्यांच्या ज्ञानाचेही कौतुक करण्यात आले.
सन्मानामुळे आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा:- आरोग्य स्वयंसेविका संगीता चांदेकर.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आरोग्य स्वयंसेविका संगीता चांदेकर म्हणाल्या, “पोलीस स्टेशनमध्ये आमचा असा शाही पाहुणचार होईल, असे कधी वाटले नव्हते. साडी देऊन केलेला सत्कार, खेळ आणि मेजवानी यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. या सन्मानामुळे आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सत्कार
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्रभारी अधिकारी पो. उप. नि. दीपक सोनूने यांनी पोलीस दल नेहमीच आरोग्य विभागाच्या पाठीशी असल्याचे आश्वासित केले. यावेळी उपस्थित सर्व आरोग्य स्वयंसेविकांचा साडी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. पोलीस स्टेशनच्या वतीने दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सर्वांसाठी चहा, नाश्ता आणि उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उप पोलीस स्टेशन पेरमिलीचे अंमलदार, एस.आर.पी.एफ. (SRPF) गट ११ चे जवान आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंद यांनी विशेष मेहनत घेतली. खाकी वर्दीतील या संवेदनशील उपक्रमामुळे पोलीस, आरोग्य विभाग आणि नागरिक यांच्यातील नाते अधिक घट्ट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
