
गुगल वरून शोधले इतरांचे आधार क्रमांक.अर्जावर नाव मात्र एकच.
नवी मुंबईतील एका महिलाच्या आधार कार्ड चे गैरवापर झाल्याने हे प्रकरण आले उघडकीस.
जयाताई लाभसेटवार
उपसंपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स
- सातारा:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नवीन पोर्टलवर सातारा जिल्ह्यातील मायणी येथील प्रतीक्षा पोपट जाधव या २२ वर्ष वयोगटातील महिलेच्या नावाचे वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करून अर्ज भरण्यात आलेले आहेत.
सद्यस्थितीत पोर्टलवर एकूण २८ अर्जांची माहिती प्राप्त झाली आहे. एकूण किती अर्ज भरण्यात आलेले आहेत, याबाबत माहिती घेण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने त्रिसदस्य समिती गठीत केलेली आहे. त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्हा कार्यक्रम तथा महिला आणि बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी विजय तावरे व बँक ऑफ महाराष्ट्रचे लीड बँक मॅनेजर नितीन तळपे यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत एकूण २८ अर्ज छाननीमध्ये निदर्शनास आलेले आहेत. या सर्व २८ अर्जामध्ये एकच नाव आहे. त्याचप्रमाणे सर्व कागदपत्रे, आधारकार्ड व इतर कागदपत्रे ही एकच आहेत. तसेच अर्ज भरताना वेगवेगळ्या आधार कार्ड क्रमांकाचा वापर करण्यात आलेला आहे, असे दिसून आले आहे. सद्यस्थितीत प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेने ऑनलाईन अर्जासोबत माणदेशी महिला सहकारी बँक, शाखा मायणी, ता. खटाव, जि. सातारा) या एकाच बँक खात्याची माहिती पडताळणी केलेल्या सर्व २८ अर्जावर भरलेली आहे. फक्त रक्कम रुपये ३००० ही दि. २९ ऑगस्ट २०२४ रोजी जमा झालेली आहे. या व्यतिरिक्त या योजनेमधून इतर आधार कार्ड दिलेल्या क्रमांकावरून ही रक्कम रुपये ३००० जमा झाली नाही. तसेच सर्व अर्जात नमूद केलेल्या बँक खात्यावर चौकशी समितीने खात्री केलेली आहे. या घटनेचा सविस्तर अहवाल आजच सादर करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या.त्यानुसार सद्यस्थितीमध्ये संबंधितांचे जाबजबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे.
*गुगल वरून शोधले वेगवेगळे आधार कार्ड क्रमांकाची माहिती.*
संबंधित महिलेने गुगलवरून वेगवेगळे आधार कार्ड क्रमांकाची माहिती प्राप्त करून घेऊन त्या क्रमांकाचा वापर करून अर्ज भरलेले आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये तिला तिच्या पतीने मदत केली आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेच्या अनुषंगाने पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. प्रशासनाच्या वतीने संबंधित आधारकार्ड क्रमांक यांच्याशी संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील घेण्याची कारवाई करण्यात यावी, अशा सूचना लीड बँकेचे व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून अर्जदार महिला व तिचा पती यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून, त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या योजनेत सर्वोच्च स्तरावरील छाननीचे पालन केले जात आहे. संबंधित महिलेच्या खात्यात केवळ तीन हजार रुपये जमा झाले आहेत. या योजनेचे दररोज परीक्षण होत असून केवळ आधार सीडेड खाते क्रमांक असलेल्या लाभार्थ्यालाच या योजनेचा लाभ दिला जात आहे. तसेच एका लाभार्थ्याला एकाच वेळी लाभ मिळेल हे छाननीवेळी सुनिश्चित केले जात आहे.
*लाडक्या भावाच्या खात्यावर पैसे*
दरम्यान, काही दिवसांपूर्वी असाच काहीसा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्ह्यात समोर आला होता. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील जाफर गफ्फार शेख असं या तरुणाचे नाव आहे. जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केला नसताना त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याने शासनाच्या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणमुळे योजनेतील भोंगळ कारभार समोर आला.
*मुंबईतील एका महिलेच्या आधारकार्डचा गैरवापर.*
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार झाल्याचे समोर आला असून, सातारा येथील एकाने चक्क आपल्या पत्नीच्या नावे ३० अर्ज दाखल करत शासनाचे हजारो रुपये लाटण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नवी मुंबईतील खारघरमधील महिला पूजा प्रसाद महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आला आहे. महामुनी यांचा अर्ज वारंवार भरूनही सबमिट होत नसल्याने तक्रार केली होती. याबाबत शोध घेतला असता महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाला असल्याचे समोर आले होते. मात्र, त्यांच्या आधारकार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर ॲड झाला होता. याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल ३० अर्ज भरल्याचे दिसून आले. यानंतर ही तक्रार पनवेल तहसिलदारांकडे करण्यात आली होती.