दारव्हा ते कारंजा मार्गावरील भांडेगाव येथील टोल नाका बंद करा. शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.
जया लाभसेटवार
उपसंपादिका यवतमाळ
दारव्हा:- यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.३६१ (सी) दारव्हा कारंजा मार्गावर भांडेगाव येथील टोलनाका त्वरित बंद करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
दारव्हा कारंजा महामार्गावरील भांडेगाव येथे नव्याने टोल सुरू आहे. या टोल नाक्यामुळे नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याची कैफियत पदाधिकारी व नागरिकांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे मांडली. त्यावर तत्काळ दखल घेत मंत्री संजय राठोड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रव्यवहार व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा टोल नाका बंद करावा अशी मागणी केली. सद्यःस्थितीत या महामार्गाचे काम अपूर्ण व अत्यंत निकृष्ट दर्जाचे असतानाही महामार्ग प्राधिकरणाने टोल नाका सुरू केला आहे. सदर टोल वसुली सुरू राहिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे टोल नाका त्वरित बंद करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर मोहोड, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, नगराध्यक्ष सुनील चिरडे, तालुकाप्रमुख मनोज सिंगी, शहर प्रमुख राजू दुबे, तालुका संघटक विवेक ठाकरे, प्रा. किशोर राठोड, कृष्णा शेलोकर, संदीप राठोड, योगेश गवळी, दीपक नाईक, विवेक जाधव, मंगेश इंगोले, घनश्याम नगराळे, राऊत आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
