राजाटोला येथील नागरिकांना पाणी-वीज सुविधा द्या
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन; १२ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित नागरिकांना न्याय देण्याची मागणी
कोरची | प्रतिनिधी
मौजा राजाटोला (नवीन ग्रामपंचायत मसेली) येथील नागरिकांना पिण्याचे पाणी व वीज यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या वतीने सोमवारी गटविकास अधिकारी (बीडीओ) कोरची यांना निवेदन सादर करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष क्रांतीदादा केरामी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कुमार बोगा उपस्थित होते.
निवेदनात नमूद केल्यानुसार, राजाटोला परिसरात गेल्या १२ ते १४ वर्षांपासून सुमारे २५ नागरिक आपल्या शेतातील झोपड्यांमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र आजपर्यंत या नागरिकांना पिण्याचे पाणी व वीज यांसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज ५ ते ६ किलोमीटर अंतर पायी जावे लागत असून उन्हाळ्यात ही समस्या अधिक गंभीर बनते. तसेच वीज सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर आणि नागरिकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनाकडे या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने पाणीपुरवठा व वीज जोडणीची व्यवस्था करण्याची मागणी.
