उपवर्गीकरणाविरोधात नागपुरात एल्गार!
२० जूनच्या महामोर्चात गडचिरोलीतून हजारोंचा सहभाग; आंबेडकरी संघटनांचा निर्धार
गडचिरोली, प्रतिनिधी : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर २० जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चात गडचिरोली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार येथील विविध आंबेडकरी सामाजिक व राजकीय संघटनांनी व्यक्त केला आहे.
शनिवारी गडचिरोली येथे आयोजित संयुक्त सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रोहिदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला आरक्षण उपवर्गीकरण बचाव कृती समितीचे नागपूर येथील ज्येष्ठ पदाधिकारी प्रीतम बुलकुंडे, ॲड. स्मिता कांबळे, बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोडे, भारतीय बौद्ध महासभेचे तुलाराम राऊत तसेच प्रा. गौतम डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रीतम बुलकुंडे यांनी महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेले अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण हे असंवैधानिक, अन्यायकारक आणि समाजात फूट पाडणारे असल्याचा आरोप केला. या प्रक्रियेमुळे घटनादत्त आरक्षणाच्या मूलभूत तत्त्वांनाच धक्का पोहोचणार असल्याचे सांगत, उपवर्गीकरणाचा प्रस्ताव तातडीने मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.
ॲड. स्मिता कांबळे यांनीदेखील उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेवर तीव्र टीका केली. अनुसूचित जातींचे आरक्षण कमकुवत करण्याच्या हेतूने हे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या अन्यायाविरोधात संपूर्ण आंबेडकरी समाजाने एकत्रितपणे संघर्ष उभारण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना रोहिदास राऊत यांनी २० जून रोजी नागपूर येथे होणाऱ्या महामोर्चात जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या महामोर्चाच्या यशस्वीतेसाठी गावागावांत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. प्रकाश दुधे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन अनिल बारसागडे यांनी तर आभार प्रदर्शन हंसराज उंदीरवाडे यांनी केले.
या सभेला बाबा घुटके, गुलाब बांबोडे, प्रदीप भैसारे, विवेक बारसिंगे, संघरक्षित फुलझेले, प्रेमेंद्र सहारे, तुळशीदास सहारे, रमेश डोंगरे, मालाताई भजगवळी, सुमित्रा राऊत, मनीषा वारके, भारत जांभुळकर, सिद्धार्थ खोब्रागडे, गिरीश मुंजमकर यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकरी बांधव उपस्थित होते.
मुख्य मागणी
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करावे व घटनादत्त आरक्षण व्यवस्थेला धक्का लावणारे निर्णय तातडीने मागे घ्यावेत, अशी प्रमुख मागणी महामोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
