आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल.
आरमोरी(गडचिरोली):- प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणास हनी ट्रॅप च्या जाळ्यात ओढले, त्यानंतर ब्लॅकमेल करुन पैसे उकळले. चार लाख दिल्यावरही भूक थांबली नाही, १५ लाखांसाठी त्याला थेट विष पाजून संपविण्याचा प्रयत्न केला. एखाद्या चित्रपटाला शोभेल, अशी ही थरारक घटना आरमोरी येथे ३ एप्रिल रोजी उघडकीस आली. याप्रकरणी तरुणीसह तिच्या दोन साथीदारांवर आरमोरी ठाण्यात खंडणी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी येथील २६ वर्षीय तरुणाचे २३ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही काळानंतर संबंधित तरुणीच्या आयुष्यात दुसऱ्या युवकाची एन्ट्री झाली. त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचा फायदा घेत तरुणीच्या दोन साथीदारांनी मध्यस्थीचा बहाणा करत पीडित तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
“तुझे चॅटिंग आमच्याकडे आहे, ते व्हायरल करून तुझी बदनामी करू,” अशी धमकी देत या त्रिकुटाने पीडित तरुणाकडून आतापर्यंत सुमारे ४ लाख रुपये उकळले. बदनामीच्या भीतीमुळे तरुणाने ही रक्कम देण्यास भाग पडले.
१५ लाखांची अतिरिक्त मागणी
आधीच मोठी रक्कम उकळूनही आरोपींचे समाधान झाले नाही. त्यांनी तरुणाकडे आणखी १५ लाख रुपये मागितले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर दबाव टाकण्यात आला.
बेदम मारहाण करून पाजले कीटकनाशक.
दि. १३ मार्च रोजी पीडित तरुण ब्रह्मपुरी मार्गाने जात असताना आरोपींनी त्याला अडवले. त्याच्यावर बेदम मारहाण करून शेतीमध्ये वापरले जाणारे कीटकनाशक बळजबरीने पाजण्यात आले. त्यानंतर तो बेशुद्ध पडताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न.
या गंभीर गुन्ह्यातून बचाव करण्यासाठी आरोपींनी ही घटना आत्महत्येसारखी दाखवण्याचा प्रयत्न केला. पीडिताच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना “बाबा मला माफ करा” असा संदेश पाठवण्यात आला. तसेच विषाच्या बाटलीचा फोटो पाठवून प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला.
नागपुरात मृत्यूशी झुंज अन् धक्कादायक खुलासा.
विषप्राशन केल्याने पीडित तरुणाची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस शुद्ध हरपलेला हा तरुण शुद्धीवर येताच ३ एप्रिलला त्याने आपबिती सांगितली, त्यामुळे पोलिसही चक्रावून गेले. विशेष म्हणजे तरुणास विष पाजल्यानंतर त्याच्या मोबाइलवरुन वडिलांना बाबा, मला माफ करा, असा मेसेज धाडला व विषाच्या बाटलीचा फोटो श्रेया हेमके हिच्या मोबाइलवर पाठविला होता, यावरुन प्रेमप्रकरणातून त्याने स्वत: विष घेतल्याचे भासविण्याचा आरोपींचा प्रयत्न होता.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल.
तक्रारीनुसार आरमोरी पोलिसांनी श्रेया हेमके, नितीन जोध, राजू अंबानी (सर्व रा. आरमोरी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या टोळीने आणखी कोणा तरुणांना अशाप्रकारे जाळ्यात ओढले आहे का? याचा तपास आता पोलिस करत आहेत. आरोपींचा शोध सुरु असल्याचे पो.नि. कैलास गवते यांनी सांगितले.
