शुद्धलेखन म्हणजे लेखनाचा आत्मा – किशोर उरकुंडवार
महात्मा फुले महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास शिबिर उत्साहात
◾ ‘चला करू सुंदर लेखन’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
आष्टी (प्रतिनिधी) :
भाषा ही संवादाचे प्रभावी माध्यम असून तिचे सामर्थ्य शब्दांमध्ये दडलेले असते. त्यामुळे शब्दांचा वापर जपून करणे आणि तेवढ्याच शुद्धतेने लेखन करणे अत्यावश्यक आहे. “शुद्धलेखन म्हणजे लेखनाचा आत्मा असून त्याचे पावित्र्य जपणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन किशोर उरकुंडवार यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय, आष्टी येथे विद्यापीठ विकास विभागाच्या वतीने आयोजित व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत ‘चला करू सुंदर लेखन’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन एस. चंद्रा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता लोखंडे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले होते.
उरकुंडवार पुढे म्हणाले की, व्यक्तिमत्त्व विकासात लेखनकलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. लेखनातील शुद्धता विचारांना ठामपणा देते, आत्मविश्वास वाढवते आणि भाषासंस्कृतीचे जतन करते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच शुद्धलेखनाची सवय लावावी. कार्यशाळेदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांकडून शुद्धलेखनाची प्रात्यक्षिके करून घेतली तसेच सोप्या उदाहरणांसह नियम स्पष्ट केले.
‘विकास व आपत्ती व्यवस्थापन’ या सत्रात प्रा. किशोर पाचभाई यांनी समाजातील आपत्ती काळात मदतीस धावून जाणाऱ्या व्यक्तींना ‘देवदूत’ अशी उपमा देत विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक वृत्ती जोपासावी, असे आवाहन केले. तसेच आग, पूर, भूकंप यांसारख्या आपत्ती व त्यावरील उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
उद्घाटकीय भाषणात डॉ. अनिता लोखंडे यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक गुणांचे सविस्तर विवेचन केले. अध्यक्षीय समारोपात डॉ. संजय फुलझेले यांनी प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भारत पांडे यांनी केले. संचालन डॉ. गणेश खुणे यांनी केले, तर आभार प्रा. रवी गजभिये यांनी मानले.
कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
