*एकलव्य… आपला हात कुरवाळतांना…*
आदिवासी साहित्य संमेलनातील कवी संमेलन रंगले
आष्टी: मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित गडचिरोली जिल्ह्य़ातील
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथे पहिले आदिवासी साहित्य संमेलन संपन्न झाले. समीरनाध्यक्ष डॉ.विनायक तुमराम, स्वागताध्यक्ष वन वैभव शिक्षण मंडळाचे सचिव मा. अब्दुल जमीर उर्फ बबलूभैय्या हकीम, सामाजिक कार्यकर्त्या शाहीन भाभीजी हकीम, निमंत्रक प्राचार्य डॉ. संजय फुलझेले ,मुख्य संयोजक डॉ.राजकुमार मुसने, प्राचार्य किशोर पाचभाई, प्राचार्य गजानन लोनबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी कवयित्री सौ. मालती सेमले यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन सत्र पार पडले. रात्री ७-३०ला कडाक्याच्या थंडीत सुरू झालेले हे कविसंमेलन कविंच्या सादरीकरणांनी अधिक रंगतदार ठरले त्यात कवि धर्मेंद्र कन्नाके यांनी भगवान बिरसाच्या हौतात्म्यास अभिवादन करणारी, ‘हे महानायका क्रांतीवीरा, तू शहीद झालास आमच्यातील उलगुलान तेवत राहावा म्हणून…’ ही ओजपूर्ण रचना सादर करीत रसिकांकडून टाळ्यांची दाद मिळवली.
कवी नागसेन सहारे यांनी, ‘पाणी जमीन जंगल जिवलग सखा सहारा,
गरजेस मानवाच्या देतो सदा निवारा, ही गझल सादर केली. कवी इरफान शेख यांनी, अल्पसंख्यांक समुदायाची वेदना, ‘पक्का मुसलमान दिसतोय, अशा मुक्तछंदात मांडत रसिकांना अंतर्मुख केले. कवी सुनील बावने यांनी, ‘प्रगतीत कागदावर दिसतात आदिवासी,
दुःखात का असे मग जगतात आदिवासी?
ही प्रश्नांकीत गझल रसिकांसमोर सादर केली.
इतर कविंमध्ये प्रा.विनायक धानोरकर, डॉ. प्रविण किल्नाके,मिलिंद उमरे, प्रतिक्षा कोडापे, एकनाथ बुध्दे, संतोष उईके, महेश कोलावार, विश्वंभर गहाणे, प्रमोद मडावी, सपना कन्नाके, रोशनी दाते,अजय राऊत, गायत्री गेडाम, अपर्णा नैताम, बाबुराव जुमनाके, ओमप्रकाश मडावी, वर्षा राजगडे, गजानन गेडाम, अहिंसक दहिवले, महेंद्र गायकवाड, योगिना मडावी, भारती तितरे, हिरा मडावी आदी सहभागी कविंनीही आपल्या कवितांमधून आदिवासीच्या जीवन जाणीवा, संस्कृती मांडण्यासोबतच कार्पोरेट- भांडवलशाहीच्या वरवंट्याखाली दडपल्या गेलेल्या आदिवासीच्या व्यथा वेदनांनाही वाचा फोडली काव्यसंमेलनात प्रसिद्ध कवी तथा सूत्रसंचालक नरेशकुमार बोरीकर यांनी,
‘मी पहातोय… श्वानाचे भुंकने आपल्या अचुक शरसंधानाने कायमचे बंद करणारा एकलव्य…!
आज आपला अंगठा विरहित हात कुरवाळतांना, आसवे ढाळतांना… ‘ही रचना सादर करीत जणू आदिवासी बेरोजगार युवकाची भळभळणारी जखम मांडली.
सोबतच त्यांनी आपल्या सूत्रसंचालनात कविंसाठी प्रसंगानुरूप समर्पक चारोळ्या, शेरोशायरी, प्रासंगिक विनोद, कोपररखळ्यांचा समर्पक वापर नरेशकुमार बोरीकर यांनी करीत बहारदारपणे हे कविसंमेलन गारठणाऱ्या थंडीतही अधिक उबदार केले. आभार गणेश शिंगाडे यांनी मानले.. सर्व कवींचा सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
