महापरिनिर्वाण दिनानिमित्त चामोर्शी पोलिस स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो भेट…
तालुका प्रतिनिधी चामोर्शी : ६ डिसेंबर २०२५ रोज शनिवारला महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून चामोर्शी पत्रकार संघाच्या वतीने चामोर्शी पोलिस स्टेशनला महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो भेट म्हणून प्रदान करण्यात आला. सामाजिक सद्भावना, समानता व बंधुतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ही भेट चामोर्शी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपक डोंब यांच्या उपस्थितीत स्टेशनमध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आली. पत्रकार संघाच्या प्रतिनिधींनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांमधून प्रशासन, लोकशाही मूल्ये आणि न्यायव्यवस्थेला मिळालेल्या बळाची जाण करून देत हा फोटो भेटस्वरूप दिला.
पोलिस निरीक्षक दिपक डोंब यांनी पत्रकार संघाचे आभार मानत सांगितले की,
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे आजही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याची आठवण ठेवणे म्हणजे संविधानिक मूल्यांप्रती आपली बांधिलकी दाखवणे होय.”
या कार्यक्रमाला पत्रकार सोनु वाळके, अरुण गव्हारे, धनराज वासेकर, मारोती बारसागडे आदी चामोर्शी पत्रकार संघाचे पदाधिकारी, स्थानिक पत्रकार आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून समाजात जागरूकता आणि प्रेरणादायी संदेश पोहोचल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
