
एटापल्ली पोलिसांची मोठी कारवाई;७ किलो गांजासह दोघांना अटक
राकेश तेलकुंटलवार एटापल्ली प्रतिनिधी
एटापल्ली, नाकाबंदीदरम्यान संशयीत दुचाकीस्वारांकडून ७ किलो गांजासह जवळपास १ लाख ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई एटापल्ली पोलिसांनी रविवारी (दि. १०) एटापल्लीतील अंडा चौकात रात्रीच्या सुमारास केली. याप्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सतीश मंडल व मिथुन जयदार (रा. पाखंजूर, जिल्हा कांकेर, छत्तीसगड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एटापल्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीत क्युआरटी अभियानांतर्गत नाकाबंदी करण्यात येत होती. दरम्यान, सतीश मंडल व मिथून जयदार हे दुचाकीने येत असताना त्यांची हालचाल संशयास्पद वाटली. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक आकाश कडव व पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. विचारपूस करताना आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता, ७ किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी आरोपींकडून गांजासह जवळपास १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे, महिला पोलिस उपनिरीक्षक रोहिणी गिरवलकर, पोलिस उपनिरीक्षक साखरे, पोलिस उपनिरीक्षक आकाश कडव, क्युआरटी जवान, पोहवा भिवा हिचामी, पोलिस शिपाई मोहन शिंदे व चालक पोलिस हवालदार गावडे यांच्या संयुक्त पथकाने केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक गिरवलकर करीत आहेत.