
समूह निवासी शाळेच्या जुन्या खोलीतील साहित्य जळून खाक.
एटापल्ली तालुक्यातील प्रकार.
एटापल्ली(गडचिरोली):- तालुक्यातील पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या समूह निवासी शाळेच्या एका खोलीला सकाळी 10 च्या दरम्यान आग लागली. आगीत जुने साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. सकाळी ही आग कशामुळे लागली किंवा कुणी लावली का? याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.याच्या शोध घेण्याचे आव्हान पोलीस विभागा पुढे निर्माण झाले आहे.
एटापल्ली येथे जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात समूह निवासी शाळा चालविण्यात येत होती. गेल्या तीन वर्षापासून तांत्रिक कारणास्तव समूह निवासी शाळा बंद आहे. जिल्हा परिषद कडून चालवण्यात येणारा समूह निवासी शाळेचा उपक्रम बंद असला तरी तीन वर्षापूर्वी निवासी विद्यार्थ्यांसाठी आलेले साहित्य एका जुनाट खोलीमध्ये गाद्या, दऱ्या व इतर साहित्य या जुन्या खोलीत ठेवण्यात आले होते. सदर साहित्य तीन वर्षांपूर्वी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. या साहित्याची गरज नसल्याने साहित्याची कुणाकडून तपासणी झाली नाही. सकाळी 10 च्या दरम्यान साहित्य ठेवण्यात आलेल्या खोलीतून अचानक धूर निघायला लागला. शाळेच्या बाजूलाच पंचायत समिती कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. धूर निघत असल्याचे पंचायत समितीत राहणाऱ्या लोकांच्या लक्षात येताच नगरपंचायत एटापल्लीला कळविण्यात आले.अग्निशामक दलाचे वाहन व कर्मचारी यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले मात्र तोपर्यंत खोलीमध्ये ठेवण्यात आलेले सर्व साहित्य जळून भस्म झाले होते. या खोलीत अजून कोण कोणते व किती साहित्य जळाले याची अजूनही अधिकृत माहिती नाही.