
गडचिरोली:- आदिवासीबहुल, मागास व नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे वर्षभराचे बजेट सावरणाऱ्या तेंदूपत्ता हंगामाला अनेक ठिकाणी प्रारंभ झाला आहे.त्यामुळे भल्या पहाटे तेंदूची पाने तोडण्यासाठी नागरिकांची रानात लगबग दिसू लागली असून दिवसभर सहपरिवार मिळून पानांचे मुडके तयार करण्यात नागरिक मग्न झाले आहेत.
वर्षांपूर्वीपासून वडिलोपार्जित सुरू असलेला तेंदूपत्ता हंगामाला सध्या जिल्हाभरातील अनेक तालुक्यात सुरुवात झाली आहे. मे महिना सुरू होताच ग्रामीण भागात तेंदू संकलनाला वेग आला आहे. पूर्वी या तेंदूपत्ता सीजनमध्ये बाहेरगावचे नागरिक तेंदूपत्ता संकलनासाठी तालुक्याचे ठिकाणी यायचे 15-15 दिवस मुक्काम करायचे. संपूर्ण कुटूंब जवळपास 2 आठवडे मुक्काम ठोकून तेंदू संकलन करीत असतात. यंदाही या हंगामाला सुरुवात झाली असल्याने ग्रामीण कुटुंबासाठी जणू तेंदू हंगाम धावून आल्याचे चित्र आहे. पूर्वी शेकडा पानाचे दर फारच कमी असायचे. पहाटेपासून पानाकरिता जंगलात जाताना सोबत आंबील, चटणी सोबतीला ‘चटणीचा बोट आणि आंबलीचा घोट’ या म्हणीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता हंगामासाठी जायचे. पाने तोडून भर दुपारी कुटुंबीय घरी परतायचे. त्यानंतर संपूर्ण कुटुंबासह पानाचे पुडके बांधण्यात व्यस्त व्हायचे. सायंकाळी विक्री केंद्र (तेंदू फळी) ठिकाणी घेऊन जायचे. तेव्हा ठेकेदार पद्धती होती. आजसुद्धा तीच ठेकेदार पद्धती कायम आहे. फरक एवढाच आहे की आज, ग्रामसभांच्या पेसा समिती माध्यमातून तेंदुपत्ता सीजन ठेकेदारांमार्फत विक्री केल्या जाते. आजचे दर समाधानकारक बोली बोलून किंवा बंद लिफाफ्यात सीलबंद करून ठेकेदारांचे दर ठरविला जाते. यात ज्या ठेकेदाराने अधिक किमतीचे दर लिहिले असेल, त्या ठेकेदारांना तेंदुपत्ता सिझनचा ठेका दिल्या जातो.
अहेरी तालुक्यात तेंदुपत्ता संकलनास सुरुवात
सद्यस्थित अहेरी तालुक्यातील बहुतेक गावात ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदुपत्ता सिझन सुरू आहे. आजचे तेंदुपत्ता शेकडा दर गावफडीवर 600 ते 800 रुपये ठरलेले असून, प्रत्येक मूळका हा 70 पानाचा बांधावा, असे ठरले आहे. पहाटेपासूनच मजूर लोक जंगलात तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात जाऊन, तेंदूपत्ता तोडून पोत्यात किंवा चुंगळीत भरून आणतात. घरी पानाचे पुडके बांधून सायंकाळी फळीवर विक्रीसाठी नेले जातात. फळीवर रात्री उशिरापर्यंत पुडके मोजण्याची प्रक्रिया पार पाडायची. काही कुटुंबात तर हा व्यवसाय रोजचे 10 ते 15 हजार रुपये कमवून देतो. या तेंदूपत्ता हंगामावर तालुक्यातील शेतकरी, मजूर, गोरगरीबांची भिस्त आहे. शेतीकामांसाठी बहुआयामी असा हा रोजगार आहे. वडिलोपार्जित सुरू असलेला तेंदूपत्ता हंगाम आधुनिक काळातही कुटुंबीयांच्या मदतीला धावून येणारा नगदी व्यवसाय आहे.