
गडचिरोली:- गडचिरोली पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन गडचिरोली जिल्हयातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने प्रत्येक गावागावात ग्राम भेटी देत पेरमिली पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.अहेरी तालुक्यातील अती दुर्गम पेरमिली उप पोलीस स्टेशन च्या मार्फतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे.
दि. 5 फेब्रुवारी रोजी दादालोरा खिडकीच्या माध्यमाच्या उपक्रमातून पेरमिली हद्दीतील अती दुर्गम भाग रापेल्ली या गावाला पेरमिली पोलिसांनी ग्राम भेट देत नागरिकांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या.
सदर ग्रामभेट दरम्यान गावातील 80 ते 90 नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजना व रोजगार प्रशिक्षणा बाबत तसेच पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविले जाणारे विविध उपक्रम व प्रशिक्षण याबाबत माहिती देण्यात आली. व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरिकांसोबत स्थानिक भाषेत संवाद साधण्यात आला.
या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना पेन,बूक व इतर शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. गावातील गरजू व गरीब महिलांना 25 साड्या देण्यात आले. तसेच गावातील इतर नागरिकांना अनेक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी अभियान दरम्यान पेरमिली उप पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दीपक सोनुने, पोउपनि योगेश महाजन, सीआरपीएफ ची अधिकारी, जिल्हा पोलीस अंमलदार, एसआरपीएफ व सीआरपीएफ अंमलदार उपस्थित होते.
अति दुर्गम रापेली गावातील नागरिकांनी पेरमिली पोलिसांकडे मांडले समस्या.
अहेरी तालुक्यातील पल्ले या ग्रामपंचायत हद्दीतील अती दुर्गम भाग असलेले रापेली या गावातील नागरिकांनी पेरमिली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दीपक सोनुने यांच्यासमोर गावातील समस्यांच्या पाढाच वाचला. पेरमिली पासून 12 किमी अंतरावर असलेले पेरमिली ते रापेल्ली असलेल्या कच्चा रस्त्याचे काम लवकरात लवकर पुर्ण करून मिळावे.शासकीय योजनांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विहिरीवर पंप नसल्याने सोलर पंप बसवून मिळावे.गावात पिण्याच्या पाण्यासाठी असलेले सोलर पंप दुरुस्त करुन मिळावे. असे अनेक समस्या मांडण्यात आले.
सदर समस्यांच्या निराकरण करण्याकरिता संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे यावेळी उप पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक सोनुने त्यांनी सांगितले.