
गडचिरोली:-जिवाची पर्वा न करता नक्षल्यांशी दोन हात करणाऱ्या गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील १८८ जणांना १२ ऑगस्ट रोजी विशेष सेवा पदक जाहीर झाले.पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील १४४८ पोलिस अधिकारी व अंमलदारांना पदक जाहीर केले.
जिल्ह्यातील पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांसमोर इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळी आव्हाने आहेत.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नक्षल्यांचा सामना करताना पोलिसांचा रोजच कस लागतो.शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबत नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी पोलिस दल डोळ्यांत तेल घालून काम करत असते. मागील तीन वर्षात नक्षल चळवळीतील महत्त्वाचे नेते चकमकीत ठार झाले तर काही जणांचा वयोमानाने मृत्यू झाला. नक्षल्यांशी झुंजतानाच सोशल पोलिसिंगचा भाग म्हणून हिंसक चळवळीकडे तरुणवर्ग भरकटू नये म्हणून दादालोरा खिडकीसारख्या अभिनव उपक्रमातून पोलिसांमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या कार्याची दखल घेत पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी स्वातंत्र्यदिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून १८८ जणांना विशेष सेवा पदक जाहीर केले आहे. त्यामध्ये पोलिस निरीक्षक २३,सहायक पोलिस निरीक्षक २४, पोलिस उपनिरीक्षक ५४, सहायक उपनिरीक्षक ३०, पोलिस नाईक २२ व पोलिस अंमलदार ४५ इत्यादी जनाचा समावेश आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल,अपर अधीक्षक कुमार चिंता, यतीश देशमुख, एम. रमेश यांनी सर्वांचे स्वागत केले आहे.