यशोगाथा : संतोष हिचामी – संघर्षातून स्वावलंबनाकडे
गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हनपायलीसारख्या अतिदुर्गम आणि विकासापासून दूर असलेल्या भागात जन्मलेला संतोष हिचामी हा अनेक अडचणींवर मात करत आज स्वावलंबनाचा आदर्श उभा करणारा युवक आहे. शिक्षण, रोजगार आणि सुविधा यांचा अभाव असलेल्या परिसरातही जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि संस्थेच्या पाठबळामुळे जीवन कसे घडवता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे संतोषची यशोगाथा.
संतोष हा विद्यार्थी असताना शैक्षणिक मदतीसाठी संस्कार संस्थेचा पहिला दत्तक गोसू हिचामी च्या मार्गदर्शनाने संस्कार संस्थेकडे आला. त्याची परिस्थिती आणि शिकण्याची तळमळ ओळखून संस्थेने त्याचे पालकत्व स्वीकारले. संतोषने बारावीपर्यंत विज्ञान शाखेत शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासोबतच संस्थेच्या Earn and Learn केंद्रात त्याने संगणक, ऑनलाइन सेवा, ग्राहक सेवा यांचे प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले.
पुढे गडचिरोली ला Graduation पूर्ण केल्यानंतर काही कारणास्तव संतोष पुन्हा आपल्या गावात परतला. अनेक तरुणांप्रमाणे त्याच्यासमोरही बेरोजगार म्हणून “आता पुढे काय?” हा प्रश्न उभा राहिला. मात्र संस्थेने दिलेले प्रशिक्षण, आत्मविश्वास आणि मार्गदर्शन यामुळे तो खचला नाही. उलट, त्याने स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून हनपायली आणि जारावंडी येथे स्वतःचे ग्राहक सेवा केंद्र सुरू केले.
आज त्या परिसरातील नागरिकांना विविध ऑनलाइन कामांसाठी 50 किमीपेक्षा जास्त अंतर प्रवास करण्याची गरज उरलेली नाही. आधार, पॅन, ऑनलाइन अर्ज, शासकीय सेवा अशा अनेक सुविधा गावातच उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे संतोषचा स्वतःचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला, तसेच संपूर्ण परिसरातील लोकांचे वेळ, पैसा आणि श्रम वाचले आहेत.
यश मिळाल्यावर संतोष थांबला नाही. तो आजही संस्कार संस्थेच्या ‘ग्रामनाथ प्रकल्पात’ सक्रियपणे मदत करत आहे. स्वतः शेती करत असतानाच तो परिसरातील शेतकऱ्यांना भातशेतीनंतर उन्नत व दुबार लागवड करून अधिक उत्पन्न कसे मिळवता येईल, यासाठी प्रेरित करीत आहे. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी तो शेतकऱ्यांमध्ये निर्माण करत आहे.
संतोष हिचामीची ही यशोगाथा सांगते की, योग्य संधी, मार्गदर्शन आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर अतिदुर्गम भागातील युवकही यशस्वी उद्योजक आणि समाजोपयोगी व्यक्ती बनू शकतो. आज संतोष केवळ स्वतःचे आयुष्य घडवत नाही, तर संपूर्ण गावाच्या विकासाचा एक आधारस्तंभ बनला आहे.
