घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात उडाली खळबळ.
यवतमाळ:- दारव्हा पोलिस स्टेशनमध्ये एक लाजिरवाणी घटना समोर आली असून, एका महिला पोलिस कॉन्स्टेबलची छेड काढणाऱ्या ठाणेदाराच्या रायटर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा पोलिस स्टेशन येथे कार्यरत एका महिला कॉन्स्टेबलची पोलिस स्टेशन मधिलच ठाणेदाराच्या रायटर ने छेड काढल्याची घटना घडली आहे. पोलिस कर्मचारी सुरेश काशिराम राठोड हा त्याच ठाण्यात कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पीडित महिलेला वारंवार त्रास देत होता. त्याने अश्लील शेरेबाजी, विनयभंगासारखी कृत्ये केली आणि पीडितेच्या इच्छेविरुद्ध वर्तन केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित महिलेने प्रथम सहकाऱ्यांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली. मात्र, आरोपीने आपल्या वर्तनात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे अखेर तिने थेट कायदेशीर कारवाईसाठी पुढाकार घेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून आरोपी पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध कलम ३५४ (महिलेला विनयभंग करण्याचा प्रयत्न), ५०९ (महिलेला अपमानित करणारे कृत्य किंवा शब्द), अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी सुरू केली असून, आरोपीला तडकाफडकी निलंबित करण्याची शक्यता आहे. तसेच, विभागीय चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या घटनेमुळे पोलिस दलात संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षेचे रक्षण करणाऱ्या यंत्रणेतच अशा घटना घडत असतील तर इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या आधी सुद्धा या पोलिस कर्मचार्यावर याच दारव्हा पोलिस स्टेशनमध्ये महिला कॉन्स्टेबलची छेड काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल असुन या आधी सुद्धा पोलिस स्टेशनमधील अनेक महिला कर्मचार्यांना मानसिक त्रास देत असुन बदनामी व दबाव पोटी कोणी तक्रार केली नसल्याचे कळते. तालुक्यासह शहरातील अवैध धंद्याच्या वसुलीतही हा पोलिस कर्मचारी माहिर आहे. वरिष्ठांकडून या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.