कोल्हापूर:- विधानसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व पक्षांचा प्रचार हा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’भोवतीच असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीतील सर्व पक्ष या योजनेचा व त्या माध्यमातून महायुतीतील पक्षांचा, उमेदवारांचा व नेत्यांचा प्रचार करत आहेत. तर काही नेते या योजनेचं अमिष दाखवून, सरकार बदलल्यावर ही योजना बंद पडेल असा प्रचार करून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच महायुतीमधील अनेक नेत्यांनी या योजनेचा प्रचार करताना वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. “लाडकी बहिण योजने’चे १५०० रुपये घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या प्रचार फेऱ्यांमध्ये दिसल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या आणि ते आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी (९ नोव्हेंबर) रात्री कोल्हापुरात आयोजित एका प्रचारसभेत बोलताना केलं होतं. त्यापाठोपाठ महायुतीमधून आणखी एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून १,५०० रुपये दिलेत, धनुष्यबाणाला मत न देता इकडे तिकडे मत दिलं तर तुमच्याकडून ३,००० रुपये वसूल करू अशी तंबी कोल्हापूर भाजपाच्या महिला उपाध्यक्षा व माजी जिल्हा परिषद सदस्या मेघाराणी जाधव यांनी दिली आहे. जाधव यांनी कोल्हापूरमध्ये एका प्रचारसभेत बोलत असताना उपस्थित महिलांना अशा प्रकारची तंबी दिल्यामुळे कोल्हापूर मधील वातावरण तापलं आहे.
मेघाराणी जाधव म्हणाल्या, “बायकांनो! माझी तुम्हा सर्व बहिणींना शपथ आहे, इथून जाताना सगळ्यांना सांगा, फक्त धनुष्यबाणाला मतदान करायचं, नाही केलं, इकडं-तिकडं काही केलं आणि आम्हाला ते समजलं तर त्यांनी (महायुती सरकारने) १५०० रुपये दिलेत, तुमच्याकडून ३,००० रुपये वसूल करू”.