*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत इरपनार येथे लोकसहभागातून उभारला वनराई बंधारा*
अविनाश नारनवरे भामरागड
तालुका प्रतिनिधी
ग्रामपंचायत मल्लमपोडूर अंतर्गत इरपनार या गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम उत्साहात पार पडले. ग्रामविकासाच्या दिशा ठरवणाऱ्या या उपक्रमात गावकऱ्यांनी दाखविलेला सहभाग कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरला. विशेष म्हणजे, सध्या शेतीची कामे सुरू असतानाही नागरिकांनी आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून श्रमदानासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
वनराई बंधाऱ्याच्या बांधकामामुळे परिसरातील पाणीसाठा वाढून भूजल पातळी सुधारण्यास मोठी मदत होणार आहे. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्यासाठी अशा प्रकारचे बंधारे अत्यंत उपयुक्त ठरतात. यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढणार असून शेती उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उपक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायत पदाधिकारी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व गावातील ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती झाली. अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास उपक्रमांची माहिती देत ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन वडे, ग्रामपंचायत अधिकारी अविनाश गोरे यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत युवक, महिला, शेतकरी, विद्यार्थी अशा सर्वच घटकांनी श्रमदानात सक्रिय सहभाग घेऊन सामुदायिक एकतेचे उदाहरण घालून दिले.
बांधकामासाठी आवश्यक साहित्याचे वहन, मातीची भरणी, रेतीच्या पिशव्या भरून बांधाची घडण, पाण्याचा प्रवाह नियंत्रित ठेवण्यासाठी मार्ग स्वच्छ करणे इत्यादी कामे ग्रामस्थांनी मनोभावे केली. काही नागरिकांनी आपल्या शेतातील कामांना थोडा अवधी देऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्रमदानात हजेरी लावली.
गावातील ही एकजूट, समन्वय आणि स्वयंस्फूर्ती प्रशासनासाठी तसेच इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. वनराई बंधाऱ्याचे हे बांधकाम पूर्ण झाल्याने परिसरात जलसंधारणाला चालना मिळणार असून ग्रामविकासाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे.
ग्रामपंचायत मल्लमपोडूर व स्थानिक ग्रामस्थांनी अशा उपक्रमांचे सातत्य राखण्याचा निर्धार व्यक्त केला असून आगामी काळातही लोकसहभागातून विकासकामे राबविण्याची तयारी दाखवली आहे.
