
सिटू संघटनेचा पुढाकार
निलिमाताई बंडमवार
मुख्य संपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स.
गडचिरोली:- आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा शैक्षणिक सत्र 2023-24 पासून सध्याच्या शालेय वेळापत्रकाप्रमाणे दोन सत्रात भरत आहेत. सिटू संलग्न आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेने हे अन्यायकारक व गैरसोयीचे वेळापत्रक बदलवून शाळा पूर्ववत 11 ते 5 या वेळात भरवण्याची मागणी केली. या मागणीला राज्याचे मुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आश्रमशाळेचे वेळापत्रक बदलण्याची दाट शक्यता आहे. तसे संकेत आदिवासी विकास मंत्र्यांनी दिले असून, याबाबत मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू झाल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
सध्याच्या 2 सत्रातील वेळापत्रकाची अंमलबजावणी 10 जुलै 2023 पासून सुरू झाली. सध्याचे वेळापत्रक सोमवार ते शुक्रवारला पहिले शालेय सत्र सकाळी 8.45 वाजेपासून सुरू होऊन दुपारी 12.30 वाजता संपते. जेवणानंतर दुसरे सत्र दुपारी 1.30 वाजता सुरू होऊन 4 वाजता तासिका संपल्यानंतरही हे सत्र सायंकाळी 6 वाजेपर्यंत असते. शनिवारला शालेय सत्र सकाळी 7.45 वाजता सुरू होऊन 11.50 ला सुटी होते. शनिवारला दुपारी 3 ते 4.30 पर्यंत प्रेरणादायी उद्बोधन असते.
सदर वेळापत्रकाचे दुष्परिणाम विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला मारक असलेल्या या वेळापत्रकाला सिटू संलग्न आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेने सुरुवातीपासूनच विरोध केला आहे.
विद्यार्थी, पालक व काही लोकप्रतिनिधींचाही या वेळापत्रकाला विरोध आहे. नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनप्रसंगी सिटू संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांना निवेदनाद्वारे वेळापत्रक बदलण्याची मागणी केली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा आदिवासी विकास मंत्र्यांना वेळापत्रक बदलण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची सूचना दिली होती. सिटू संघटनेने वेळापत्रक बदलण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी यापूर्वी दोनदा मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. त्याचप्रमाणे वेळोवेळी निवेदनेही दिलेली आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही संघटनेच्या पदाधिका-यांनी वेळापत्रक बदलण्याची मागणी लावून धरली होती.