
आदिवासी आश्रमशाळेतील प्रश्नांवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार आक्रमक; एकात्मिक प्रकल्प कार्यालयासमोर पाच तास ठिय्या आंदोलन.
नाशिक:- आश्रमशाळांमधील समस्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांनी दि. 28 जुलै रोजी कळवण येथे एकात्मिक प्रकल्प कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन केले. मात्र तब्बल पाच तास ठिय्या मांडूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून समर्पक असे उत्तर मिळत नसल्याने आमदार नितीन पवार पवार हे चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. एकात्मिक प्रकल्प कार्यालयासमोर उपस्थित अधिकाऱ्यांना ‘तुम्हाला काय माज आला आहे एवढा, तुमचा माज मी जिरवतो.असे खडेबोल सुनावले. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनाही मटका, दोन नंबर हे कुठलेच धंदे इथे चालू देवू नका. मला सगळे धंदे बंद पाहिजे, असा सज्जड दमच त्यांनी भरला.
जोपर्यंत आश्रमशाळांना शिक्षक मिळत नाही. तोपर्यंत त्या शाळा बंदच ठेवण्याचा इशारा.
शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक-शिक्षके तर कर्मचाऱ्यांची पदे 100 टक्के पदे भरली जात नाही. तोपर्यंत शासकीय आश्रमशाळेला टाळे ठोकण्याचा इशारा आमदार नितीन पवार यांनी देत पालकांनी मुला-मुलींना आश्रमशाळेतून घरी घेऊन जाण्याचे आवाहन आमदार पवार यांनी केले होते. शासकीय आश्रमशाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी झाला, आश्रमशाळेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात निवेदन, मागणी, आंदोलन करूनही आदिवासी विकास विभाग व कळवणच्या प्रकल्पधिकारी व यंत्रणेने कर्मचारी नियुक्त केले नाहीत. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी द्या, प्रमुख मागणीसाठी कळवणच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पायरीवर आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनावेळी नितीन पवार हे प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.