बँक ऑफ महाराष्ट्रच्या मॅनेजरने आदिवासी वृद्ध शेतकऱ्याची केली १० लाखांची फसवणूक; एफडी करतो सांगून केला कारनामा.
हिंगणा:- हिंगणा पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या लखमापूर गावातील आदिवासी वृद्ध शेतकऱ्याची बँकेकडून दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची बाब पुढे आली आहे. शिवाजी चिमणा भलावी (वय ८०) यांची समृद्धी महामार्गात शेती गेल्यामुळे शासनाकडून मोबदल्याच्या स्वरूपात त्यांना काही रक्कम मिळाली होती. ती रक्कम त्यांनी आमगाव देवळी येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथील शाखेत ठेवली होती. तेव्हा खात्यात असलेली ती रक्कम पाहून त्यावेळी कार्यरत असलेल्या महिला बैंक व्यवस्थापक श्रुती बोरकर यांनी शेतकरी शिवाजी भलावी यांना बँकेत बोलावून बँकेत फिक्स डिपॉझिट करण्यास सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार शेतकरी तयार होऊन त्यांनी सह्या दिल्या. मात्र त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत बँक व्यवस्थापकाने त्यांची ती रक्कम खाजगी कंपनीत परस्पर त्यांना न सांगता वळती केली. एफडीच्या नावावर बँक व्यवस्थापकाने १२ ऑक्टोबर २०२० रोजी शेतकऱ्याच्या खात्यातून ५ लाख २२ हजार ५०० रुपये खाजगी कंपनीत पाठवले. तसेच दुसऱ्या वर्षी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी पुन्हा शेतकऱ्याच्या बैंक खात्यातून ५ लाख ११ हजार २५० रुपये खाजगी कंपनीत वळते झाले. त्यावेळी शिवाजी भलावी यांनी चौकशी केली असता त्यांना बँकेद्वारे सांगण्यात आले की, ते एफडीचे आहेत व पाच-सहा वर्षांनी मिळतील. परंतु शिवाजी भलावी यांचा बँक व्यवस्थापकावरचा विश्वास उडाल्यामुळे त्यांनी खात्यातून रक्कम कमी करणे सुरू केले.
मात्र आता पाच वर्षांनंतर आदिवासी वृद्ध शेतकरी रक्कम काढायला गेले असता भरलेली रक्कम ही त्यांना परिपूर्ण परत मिळत नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर त्यांनी वकिलामार्फत रिझर्व्ह बँक, बैंक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय कार्यालय व बैंक ऑफ महाराष्ट्र आमगाव शाखा यांना लेखी तक्रार सादर केली आहे.
“आमच्या अडाणीपणाचा (अशिक्षितपणाचा) फायदा घेत आमची बँक व्यवस्थापकाने फसवणूक केली. म्हणून आम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे की माझे भरलेले पूर्ण पैसे व्याजासहित परत देण्यात यावे. त्या बँक व्यवस्थापकावर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून माझ्यासारख्या अशिक्षित लोकांची बँकेमध्ये फसवणूक केली जाणार नाही.”- शिवाजी भलावी, तक्रारदार
“अशा प्रकरणांमध्ये ग्राहकांना न्याय मिळू शकते. यासाठी नागरिकांनी ग्राहक पंचायत, ग्राहक न्यायालय किंवा न्यायालयात जाऊन दाद मागितल्यास अशा प्रकारच्या फसवणुकीत ग्राहकांना न्याय मिळू शकतो.”– मल्लिका गोयंका, वकील, नागपूर
